10 झेल घेतल्यानंतर ॲलेक्स कॅरीने केली 25 वर्षांच्या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती, ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत केला न्यूझीलंडचा पराभव


ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धची 2 कसोटी मालिका जिंकली आहे. वेलिंग्टनमधील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने क्राइस्टचर्चमध्ये खेळली गेलेली दुसरी कसोटीही 3 विकेट्सने जिंकून मालिकेवर कब्जा केला. यासोबतच लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंडवरचे वर्चस्व येथेही अबाधित दिसून आले. याआधी टी-20 मालिकेतही ऑस्ट्रेलियाने यजमान किवींचा पराभव केला होता.

क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 279 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या डावात विजयाचे हे लक्ष्य गाठणे तितके सोपे नव्हते, जे एकेकाळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 80 धावांवर 5 विकेट गमावले होते, तेव्हाही जाणवले. पण, यानंतर ॲलेक्स कॅरीने क्रीजवर नांगर रोवला आणि ॲडम गिलख्रिस्टने 25 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून जे केले होते तेच केले.

1999 मध्ये, ॲडम गिलख्रिस्ट हा पहिला यष्टिरक्षक फलंदाज बनला होता, ज्याने चौथ्या डावात 90 पेक्षा जास्त धावा करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या त्या कसोटीच्या चौथ्या डावात गिलख्रिस्टने नाबाद 149 धावा केल्या होत्या. आता ॲलेक्स कॅरीने 2024 साली ऑस्ट्रेलियासाठी चौथ्या डावात अशीच कामगिरी केली आहे. त्याने क्राइस्टचर्च कसोटीत 98 धावांची नाबाद खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.