महिला दिनानिमित्त PM मोदींची नारी शक्तीला भेट, कमी केली LPG सिलेंडरची किमत


महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. ट्विट करताना ते म्हणाले की, आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच, शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल.

पंतप्रधान मोदींचा हा निर्णय देशभरातील सर्व सिलेंडरधारकांना लागू होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडरच्या किमतीत 300 रुपयांची सवलत पुढील एक वर्षासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने काल घेतला होता. त्यापलीकडे, सर्व सामान्य सिलेंडर ग्राहकांना प्रति सिलेंडर 100 रुपयांची सूट लागू होईल.


त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात की आम्ही आमच्या स्त्री शक्तीच्या सामर्थ्याला आणि धैर्याला सलाम करतो आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आपल्या कामगिरीवरूनही हे दिसून येते.