टीम इंडिया करणार चमत्कार, धरमशालामध्ये 8 खेळाडू करणार पदार्पण


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. टीम इंडियाला देखील मालिका 4-1 ने जिंकायची आहे. हैदराबादमधील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले आणि सलग तीन सामने जिंकून मालिका जिंकली. आता पाचवा सामना धरमशाला येथे होणार असून यामध्ये टीम इंडियाचे आठ खेळाडू पदार्पण करणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसे? तर आम्ही तुम्हाला सांगतो.

धर्मशाला येथे आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे. मार्च 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना झाला होता. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर येथे कसोटी सामना होत असून यावेळीही टीम इंडियाला जिंकण्याची इच्छा आहे.

भारताने 2017 मध्ये खेळलेल्या सामन्यातील प्लेइंग-11 आणि 7 मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या संघातील संभाव्य प्लेइंग-11 पाहिल्यास टीम इंडियाच्या आठ खेळाडूंचे पदार्पण निश्चित दिसते. 2017 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात सध्याच्या संघाचे तीन खेळाडू प्लेइंग-11 मध्ये होते. हे तीन खेळाडू होते रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव. हे तिघेही इंग्लंडविरुद्ध खेळणार हे निश्चित मानले जात आहे. हे तिघे गेल्या सामन्यातही खेळले असून संघाला यश मिळाले आहे. यावेळीही तिघेही खेळणार आहेत. परंतु उर्वरित आठ खेळाडूंनी याआधी धरमशालामध्ये एकही कसोटी सामना खेळलेला नाही, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचाही समावेश आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान, रजत पाटीदार, आकाशदीप, ध्रुव जुरेल यांच्या नावांचाही समावेश आहे. प्लेइंग-11 मध्ये संघाने बदल केला, तरी आकाशदीपच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. अशा परिस्थितीतही टीम इंडियाचे आठ खेळाडू धर्मशालामध्ये पदार्पण करणार आहेत.

2017 मध्ये जेव्हा टीम इंडिया या मैदानावर उतरली, तेव्हा भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पदार्पण केले होते. त्या सामन्याच्या पहिल्या डावात कुलदीपने चार विकेट घेत डेव्हिड वॉर्नरला आपला पहिला बळी बनवला होता. त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली होता, पण कोहली त्या सामन्यात खेळला नाही आणि अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले. रहाणे आता संघाबाहेर आहे आणि कोहली ब्रेकवर आहे. जर कोहलीही खेळला असता, तर त्याचा देखील या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना ठरला असता.