कोलकात्यात पाण्याखाली धावणार मेट्रो, 1 मिनिटात पार करणार हुगळी नदी; जाणून घ्या खासियत


दिल्ली असो, मुंबई असो वा बेंगळुरू, सगळीकडे तुम्ही मेट्रो पाहिली असेल एकतर भूमिगत किंवा उंच. भारतात पहिल्यांदाच मेट्रो नदीच्या खालून जाणार आहे. यामुळे तासन्तास लागणारा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईल, असा कोलकाता मेट्रोचा दावा आहे. तुम्ही फक्त एका मिनिटात मेट्रोने हुगळी नदी पार करू शकाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वॉटर टनेल मेट्रोचे लोकार्पण करणार आहेत.

ईस्ट वेस्ट मेट्रो टनेल हा कोलकाता मेट्रोने बांधलेला नदीच्या पाण्याखालील बोगदा आहे. कोलकाता मेट्रोने अलीकडेच पाण्याखालील मेट्रो ट्रेनची चाचणी घेतली आहे. हा बोगदा हुगळी नदीच्या पूर्वेकडील एस्प्लेनेड आणि पश्चिमेकडील हावडा मैदान यांना जोडतो. देशात पहिल्यांदाच नदीच्या खालून मेट्रो धावणार आहे.

बोगदा पृष्ठभागापासून अंदाजे 33 मीटर खाली आहे. हावडा ते एस्प्लेनेड हा एकूण मार्ग 4.8 किलोमीटर लांबीचा आहे. यात 520 मीटरच्या पाण्याखाली बोगदा आहे. या अर्धा किलोमीटर लांबीच्या पाण्याखालील बोगद्यातून प्रवासी 1 मिनिटापेक्षा कमी वेळात जातील. कोलकाता मेट्रोचा हा बोगदा लंडन आणि पॅरिस दरम्यानच्या चॅनल टनेलमधून जाणाऱ्या युरोस्टार ट्रेनप्रमाणे बनवण्यात आला आहे. Afcons ने एप्रिल 2017 मध्ये बोगदे बांधण्यासाठी उत्खनन सुरू केले आणि त्याच वर्षी जुलैमध्ये ते पूर्ण केले.

या अंडरवॉटर मेट्रो बोगद्याचा खालचा भाग पाण्याच्या पृष्ठभागापासून 33 मीटर खाली आहे. हे एखाद्या अभियांत्रिकी चमत्कारापेक्षा कमी नाही. वॉटरप्रूफिंग आणि बोगदा डिझाइनिंग ही त्याच्या बांधकामातील प्रमुख आव्हाने होती. बोगद्याच्या बांधकामादरम्यान, 24×7 क्रू तैनात करण्यात आले होते. TBM (ट्यूनल बोरिंग मशीन) ने बोगदा बांधण्यासाठी उत्खनन करण्यात आले. नदीत प्रवेश करण्यापूर्वी टीबीएम गळतीविरोधी यंत्रणांनी सुसज्ज होते. हा बोगदा 120 वर्षे सेवा देण्यासाठी बांधण्यात आला आहे. नदीच्या बोगद्यात पाण्याचा थेंबही जाऊ शकत नाही.

विद्यासागर सेतू हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे आणि आशियातील सर्वात लांब पुलांपैकी एक आहे. त्याची लांबी 823 मीटर (2700 फूट) आहे. हुगळी नदीवर बांधलेला हा दुसरा पूल आहे. पहिला हावडा पूल ज्याला रवींद्र सेतू असेही म्हणतात. हुगळी नदी, ज्याला भागीरथी-हुगली, गंगा आणि काटी-गंगा असेही म्हणतात. ती गंगा नदीची उपनदी म्हणून पश्चिम बंगालमध्ये सुमारे 260 किलोमीटरपर्यंत वाहते. गिरिया, मुर्शिदाबादजवळ ती पद्मा आणि हुगळीमध्ये विभागते.