तुमचा पगार जरी 12 लाख रुपये असला, तरी तुम्हाला भरावा लागणार नाही एक रुपयाही कर, असे आहे संपूर्ण गणित


फेब्रुवारी-मार्च महिना कर्मचारी आणि कंपन्यांमधील कामासह सरकारी समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचे आव्हान घेऊन येतो. यामध्ये नोकरीची कामे पूर्ण करण्यासोबतच कर्मचाऱ्याला त्याच्या गुंतवणुकीचा तपशीलही कंपनीला द्यावा लागतो. जेणेकरून कर बचतीचा पर्याय तयार करता येईल. जर तुम्ही ही माहिती दिली नाही आणि ITR फाईल केली नाही, तर इन्कम टॅक्स कार्यालय तुम्हाला नोटीस पाठवते.

नियमांनुसार, जुन्या कर प्रणाली अंतर्गत 5 लाख रुपये आणि नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कक्षेत ठेवण्यात आले आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारकडून काही कर सूटही दिली जातात. आज आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही 12 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर शून्य कराचा लाभ घेऊ शकाल.

कसा मिळवायचा शून्य कर लाभ?
समजा तुमचे वार्षिक पॅकेज 12 लाख रुपये आहे आणि तुम्ही तुमचा आयकर शून्य कसा करू शकता? ते आज जाणून घेणार आहोत. या 3 स्टेप्समध्ये समजून घेऊ संपूर्ण प्रक्रिया.

पहिली स्टेप
जर तुमचा पगार 12 लाख रुपये असेल, तर तुम्ही त्याची रचना अशा प्रकारे करू शकता की तुमचा एचआरए 3.60 लाख रुपये असेल, तुमचा एलटीए रुपये 10,000 असेल आणि फोनचे बिल 6,000 रुपये असेल. तुम्हाला कलम 16 अंतर्गत पगारावर 50,000 रुपयांची मानक वजावट मिळेल. तुम्ही रु. 2500 च्या प्रोफेशन टॅक्सवर सूट मागू शकता. तुम्ही कलम 10 (13A) अंतर्गत रु. 3.60 लाख HRA आणि कलम 10 (5) अंतर्गत रु. 10,000 च्या LTA वर दावा करू शकता. या कपातीमुळे तुमचा करपात्र पगार 7,71,500 रुपयांपर्यंत खाली येईल.

दुसरी स्टेप
जर तुम्ही LIC, PPF, EPF मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा तुम्ही तुमच्या मुलाची शिकवणी फी भरली असेल, तर तुम्ही कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा दावा करू शकता. ज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या टियर-1 योजनेत गुंतवणूक केली आहे, ते कलम 80CCD अंतर्गत 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीसाठी पात्र आहेत. या दोन्ही कपातीनंतर तुमचे करपात्र उत्पन्न रु. 5,71,500 होईल.

तिसरी स्टेप
सेक्शन 80D तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसींवर भरलेल्या प्रीमियमसाठी कर सवलतीचा दावा करण्याची परवानगी देते. तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी रु. 25,000 क्लेम करू शकता, तर तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिक पालकांच्या आरोग्य पॉलिसींवर भरलेल्या प्रीमियमसाठी रु. 50,000 च्या अतिरिक्त सूटचा दावा करू शकता. यासह तुम्हाला 75,000 रुपयांच्या कपातीचा लाभ मिळेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न 4,96,500 रुपये होईल.

आणि जुन्या कर प्रणालीनुसार, जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला त्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. म्हणजे तुम्ही शून्य करासाठी पात्र असाल. मग झाले ना शून्य करपात्र उत्पन्न.