
विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळत नाही आहे. वैयक्तिक कारणांमुळे कोहलीने मालिकेपूर्वी आपले नाव मागे घेतले होते. यासोबतच कोहली आणि इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील लढतीपासून चाहते वंचित राहिले. यामुळे केवळ चाहते निराश झाले नाहीत, तर खुद्द अँडरसनलाही याचा पश्चाताप होत आहे. या मालिकेत तो कोहलीला गोलंदाजी करू शकला नाही, ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याचे अँडरसनने म्हटले आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहलीने आपले नाव मागे घेतले होते. 15 फेब्रुवारीला त्याची पत्नी अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला.
विराट कोहली खेळत नसल्यामुशे जेम्स अँडरसनने ‘It’s a Shame’ असे का म्हटले?
कोहली आणि अँडरसन यांच्यातील लढतीची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अँडरसन हा अशा गोलंदाजांपैकी एक आहे, जो कोहलीला खूप त्रास देतो. त्याने त्याला अनेक वेळा कसोटीमध्ये आपला बळी बनवले आहे. यावेळीही कसोटी मालिकेत कोहली आणि अँडरसन यांच्यात लढत होईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
जिओ सिनेमाशी बोलताना अँडरसनने सांगितले की, कोहली न खेळल्याने इंग्लंड संघाच्या चाहत्यांना सर्वात जास्त आनंद होईल, कारण कोहली एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो तिथे असता, तर तो चांगला खेळला असता. यानंतर अँडरसन म्हणाला की त्याच्या दृष्टिकोनातून हे चांगले नाही, कारण त्याला सर्वोत्तम खेळाडूंसमोर स्वतःची परीक्षा करायची असते. अँडरसन म्हणाला की, अनेक वर्षांपासून त्याला कोहलीला गोलंदाजी करणे खूप आव्हानात्मक वाटले आहे आणि जर तो खेळला नाही, तर ही इंग्लंड संघ आणि अँडरसनसाठी शरमेची बाब असेल. कोहली या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. मात्र, ही मालिका अजून संपलेली नाही. या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. भारताने याआधीच मालिका जिंकून 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
2014 मध्ये भारताने इंग्लंड दौऱ्यावर असताना अँडरसनने कोहलीला खूप त्रास दिला होता. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत कोहलीला अर्धशतकही झळकावता आले नाही. मात्र चार वर्षांनंतर भारताने पुन्हा इंग्लंडचा दौरा केला, तेव्हा कोहलीने शानदार पुनरागमन केले. त्यानंतर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला. त्याने 593 धावा केल्या होत्या. हे दोघे समोर आल्यावर त्यांच्यात चुरशीची स्पर्धा होते.
