ऋषभ पंत आयपीएल खेळणार की नाही, 5 मार्चला होणार मोठा निर्णय, सौरव गांगुलीने केला खुलासा


ऋषभ पंत एका वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर आहे. प्रत्येकजण त्याच्या परतीची वाट पाहत आहे. पंतही पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे. पंत यावेळी आयपीएलच्या आगामी मोसमात खेळेल अशी पूर्ण अपेक्षा आहे. पण पंत आयपीएल खेळू शकणार की नाही याबाबतची स्थिती 5 मार्चला स्पष्ट होईल. पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. दिल्ली फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली याने पंतबाबत मोठे अपडेट दिले आहे. पंतची 5 मार्च रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी होईल, ज्यामध्ये त्याला तंदुरुस्त घोषित केले जाईल, असे गांगुलीने सांगितले आहे.

भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला होता, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या अस्थिबंधनाला दुखापत झाली होती, ज्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पंत आता पुनरागमनाच्या मार्गावर आहे आणि 5 मार्च रोजी तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही याबद्दल त्याच्याबद्दल बातम्या येऊ शकतात. गांगुलीच्या वक्तव्यावर नजर टाकली, तर पंत पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना गांगुलीने हे सांगितले.

गांगुलीला मुलाखतीत विचारण्यात आले की, 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये पंत दिल्लीचा कर्णधार असणार की आणखी कोणी? यावर गांगुली म्हणाला की पंतने तंदुरुस्त होण्यासाठी जे काही करायचे आहे, ते केले आहे आणि त्यामुळेच एनसीए त्याला फिट म्हणून घोषित करेल. तो म्हणाला की, पंतला 5 मार्चला चाचणी पास होऊ द्या. त्यानंतर आम्ही कर्णधारपदाच्या पर्यायांचा विचार करू. गांगुली म्हणाला की फ्रँचायझी त्याच्याबद्दल खूप काळजीपूर्वक पावले उचलत आहे, कारण त्याची कारकीर्द खूप लांब आहे. गांगुली म्हणाला की, आम्हाला त्याला उत्साहात ढकलायचे नाही. पंत कशी प्रतिक्रिया देतो, यावर बरेच काही अवलंबून असल्याचे गांगुली म्हणाला. गांगुली म्हणाला की, एनसीएकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंत फ्रँचायझी शिबिरात सहभागी होईल.

गांगुली पंतच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाच्या पर्यायांबद्दल बोलला नाही, परंतु त्याने यष्टीरक्षक म्हणून पंतच्या पर्यायांबद्दल बोलले. गांगुली म्हणाला की, दिल्लीकडे यष्टिरक्षकांसाठी कुमार कुशाग्रा आणि रिकी भुईसारखे खेळाडू आहेत. याशिवाय गांगुलीने शे होप आणि ट्रिस्टन स्टब्सचे नाव देखील घेतले, जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतात.