गुगलचा सर्जिकल स्ट्राईक! प्ले स्टोअरवरून काढून टाकले Naukri आणि Shaadi.com सह 10 ॲप


गुगल प्ले स्टोअरच्या बिलिंगचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. अमेरिकन प्ले स्टोअर कंपनीने बिल न भरणाऱ्या ॲप डेव्हलपर्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. Google Play Store वरून 10 भारतीय कंपन्यांचे ॲप काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. यामध्ये Naukri.com, Shaadi.com, 99 acres.com या लोकप्रिय ॲप्सच्या नावांचा समावेश आहे. सर्च इंजिन कंपनीचे म्हणणे आहे की या ॲप डेव्हलपर्सने त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे.

Google ने Google Play Store चे पेमेंट धोरण अपडेट केले आहे. या भारतीय कंपन्यांनी प्ले स्टोअरचे सेवा शुल्क भरलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे नाराज होऊन गुगल आपल्या प्ले स्टोअरवरून 10 भारतीय ॲप्स काढून टाकत आहे. या कंपन्या गुगलला सेवा शुल्क भरण्यात सातत्याने अपयशी ठरल्या आहेत.

Google Play Store वरून जे 10 ॲप्स काढून टाकणार आहे, त्यात Shaadi.com, Quack Quack, Stage, InfoEdge च्या मालकीचे ॲप्स जसे Naukri.com आणि 99 acres.com यांचा समावेश आहे. भारतीय स्टार्टअप आणि गुगल यांच्यात सेवा शुल्काबाबत वाद सुरू आहे. स्टार्टअपचे म्हणणे आहे की गुगलचे सेवा शुल्क खूप जास्त आहे.

Google Play Store वरून ॲपमधील खरेदी आणि ॲप डाउनलोड करण्यावर 26 टक्के सेवा शुल्क कापते, ज्याला स्टार्टअप विरोध करतात. Google ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये पेमेंट पॉलिसी अंतर्गत ॲप काढून टाकल्याची पुष्टी केली आहे. तथापि, कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये कोणत्याही कंपनीचे नाव दिलेले नाही.

गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कंपन्यांना तीन वर्षे आणि तीन आठवड्यांचा कालावधी दिल्यानंतर आम्ही आवश्यक ती पावले उचलली आहेत. यामुळे कंपनीचे धोरण अमलात आणण्यास मदत होईल, असा विश्वास गुगलला आहे. जगाच्या कोणत्याही भागात आमच्या धोरणांचे उल्लंघन झाल्यास आम्ही हेच करतो.