पुनरागमनाच्या सामन्यात इशान किशन ठरला सपशेल अपयशी, 12 चेंडूत संपला खेळ, संघाचेही झाले नुकसान


युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याने दक्षिण आफ्रिका दौरा मध्यंतरी सोडला आणि त्यानंतर त्याच्याबद्दल सतत येणाऱ्या बातम्या. इशानने टीम मॅनेजमेंटकडून मानसिक विश्रांती मागितली होती, पण त्यानंतर बातम्या आल्या की इशानला सतत संधी न मिळाल्याचा राग आला आणि त्यामुळेच त्याने टीम सोडली. दरम्यान, तो रणजी करंडकही खेळला नव्हता. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर बीसीसीआयही या प्रकरणावरुन इशानवर नाराज आहे. या सगळ्यात इशान क्रिकेटच्या खेळपट्टीवर परतला. पण त्याचे पुनरागमन निराशाजनक होते. इशानने मुंबईत डीवाय पाटील क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता.

या स्पर्धेत इशान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खेळत आहे. मंगळवारी या संघाचा सामना रूट मोबाईल संघाशी झाला. प्रथम फलंदाजी करताना या संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 192 धावा केल्या. इशानचा संघ हे लक्ष्य गाठू शकला नाही आणि 16.3 षटकात 103 धावांवर बाद झाला.

या सामन्यात इशानने विकेटकीपिंगही केली. सायन मोंडलच्या चेंडूवर त्याने सुमीत ढेकळेला यष्टिचित केले. इशानला फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. त्याने केवळ 19 धावा केल्या. इतक्या धावा करण्यासाठी इशानने 12 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. तो आपल्या संघाला 89 धावांच्या पराभवापासून वाचवू शकला नाही. क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर इशान बडोद्यात होता आणि तिथे हार्दिक पांड्यासोबत सराव करत होता, पण पहिल्या सामन्यात त्याचे पुनरागमन निराशाजनक होते. त्याच्याकडून अपेक्षित फलंदाजी त्याने दाखवली नाही. रुट मोबाईल संघाकडून बद्रे आलमने 20 धावांत पाच बळी घेतले.

टीम इंडियातून ब्रेक घेतल्यानंतर इशानला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात स्थान मिळाले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळणाऱ्या इशानने संघासाठी शेवटचे रणजी ट्रॉफी फेरीचे सामने खेळले नव्हते. त्याच्याबद्दल टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशानला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. पण इशानने राहुलचे ऐकले नाही. त्यामुळे बीसीसीआयने कडक भूमिका घेत रणजी ट्रॉफी खेळण्याचा आग्रह धरला होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी लिहिले होते की, देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, कारण टीम इंडियामध्ये निवड करण्याचा हा निकष आहे. इशान बडोद्यात आयपीएलची तयारी करत होता. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या मोसमात पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे.