एका षटकात 4 विकेट… ज्याचा 9 दिवसांपूर्वीही नव्हता थांगपत्ता, त्या गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगमध्ये इतिहास रचला


क्रिकेटमध्ये कधी आणि कोणता खेळाडू शून्यातून हिरो बनेल, हे सांगता येत नाही. सध्या पाकिस्तानचा 29 वर्षीय लेगस्पिनर आरिफ याकूबही अशाच पद्धतीने हिरो बनला आहे. नऊ दिवसांपूर्वीपर्यंत त्याचा काहीच थांगपत्ता नव्हता. पण, 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळी लाहोरच्या खेळपट्टीवर त्याच्या चेंडूंनी असा कहर केला की आता त्याचे नाव पीएसएलच्या इतिहासाच्या पानात नोंदले गेले आहे. सामन्यात 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 18 षटकांत 181 धावा करून एकेकाळी फ्रंटफूटवर असलेला इस्लामाबाद युनायटेड, आरिफ याकूबच्या तडाख्यामुळे पेशावर जाल्मीविरुद्ध अचानक बॅकफूटवर गेला.

आरिफ याकूबने केलेल्या आश्चर्यकारक पराक्रमाचा त्या षटकाशी संबंध होता, ज्याने इस्लामाबाद युनायटेड संघात गोंधळ निर्माण केला होता. इस्लामाबाद युनायटेडच्या डावाच्या 19व्या षटकात आरिफ याकूबचा कहर इस्लामाबाद युनायटेडवर पाहायला मिळाला. या षटकात, इस्लामाबाद युनायटेडच्या विकेट्सची संख्या अचानक 4 विकेट्सवरून 8 विकेट्सपर्यंत वाढली, कारण आरिफ याकूबने तशीच गोलंदाजी केली होती.

आरिफ याकूबने 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इस्लामाबाद युनायटेडचा फलंदाज कॉलिन मुन्रोला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर त्याने 1 धाव दिली. तर हैदर अली तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. चौथ्या चेंडूवर त्याने पुन्हा सिंगल दिली. पाचव्या चेंडूवर फहीम अश्रफची आणि सहाव्या चेंडूवर हुनैन शाहची विकेट काढून त्याने इस्लामाबाद युनायटेडच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली.

या षटकापूर्वी आरिफ याकुबच्या नावे केवळ 1 विकेट होती. पण 19 वे षटक संपल्यानंतर आता या सामन्यात त्याच्या नावावर एकूण 5 विकेट झाल्या होत्या, जे त्याने 4 षटकात 27 धावा देत घेतले. हा तोच आरिफ याकूब आहे, ज्याला 17 फेब्रुवारीला पाकिस्तान सुपर लीग सुरू होण्यापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. पण, आता पीएसएलमध्ये एका षटकात 4 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.