फोन स्क्रीनवर दिसणार कॉलरचे नाव, ट्रायच्या आदेशानंतर सुरू झाली सुविधा


दूरसंचार नियामक ट्रायने टेलिकॉम नेटवर्कमध्ये फोन स्क्रीनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दाखवण्याची सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने शुक्रवारी आपल्या शिफारशीत म्हटले आहे की, ‘कॉलिंग नेम प्रेझेंटेशन’ (CNAP) पूरक सेवेअंतर्गत मोबाइल फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव प्रदर्शित करण्याची प्रणाली सुरू करावी. मात्र, सर्व टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या विनंतीनुसारच ही सुविधा देतील.

ही सुविधा सुरू झाल्यामुळे वारंवार येणाऱ्या नको असलेल्या कॉल्सपासून सुटका होण्यास मोठी मदत होणार आहे. CNAP वैशिष्ट्य सक्रिय झाल्यावर, ग्राहक त्याच्या फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव पाहू शकेल.

ट्रायने म्हटले आहे की, सरकारने एका विशिष्ट तारखेनंतर भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व फोनमध्ये CNAP सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना योग्य सूचना द्याव्यात.

मोबाईल फोन कनेक्शन घेताना ग्राहक अर्ज फॉर्म (CAF) मध्ये दिलेले नाव आणि ओळख तपशील CNAP सेवेदरम्यान वापरले जाऊ शकतात. जिथे नेटिव्ह स्मार्टफोन टूल्स आणि Truecaller आणि Bharat Caller सारखी ॲप्स देखील कॉलरचे नाव ओळखणे आणि स्पॅम शोधण्याच्या सुविधा प्रदान करतात. परंतु या सेवा लोकांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित असतात, जे नेहमी विश्वसनीय नसते.

दूरसंचार नियामकाने शिफारस केली आहे की सर्व प्रवेश सेवा प्रदात्यांनी त्यांच्या टेलिफोन ग्राहकांना विनंतीनुसार CNAP सेवा प्रदान करावी. TRAI ने नोव्हेंबर 2022 मध्ये या संदर्भात एक सल्लापत्र जारी केले होते आणि वापरकर्ते, लोक आणि कंपन्यांकडून टिप्पण्या मागितल्या होत्या.

आतापर्यंत मोबाईल वापरकर्ते थर्ड पार्टी ॲप Truecaller च्या मदतीने कॉलरची माहिती मिळवायचे. ज्यामध्ये मोबाईल यूजर्सचा डेटा लीक होण्याचा धोका असतो, कारण Truecaller ॲपच्या इन्स्टॉलेशनसोबत ते तुमच्याकडून अनेक परवानग्या मागते, ज्यामध्ये तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट, मेसेज आणि फोटो सेव्ह करणे आणि इतर माहिती समाविष्ट असते. अशा परिस्थितीत ट्रायच्या या निर्णयानंतर तुम्हाला थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करण्याची गरज भासणार नाही.