एक हॉटेल, जिथे कर्मचारी करतात ग्राहकांचा खूप अपमान, तरीही असते गर्दी !


जेव्हा लोक हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जातात, तेव्हा ते साहजिकच तेथील सेवा आणि सुविधा पाहतात आणि कर्मचारी ग्राहकांशी कसे वागतात आणि जेवण कसे दिले जाते, हे देखील पाहतात. या सर्व गोष्टींमुळे एखादे हॉटेल किंवा रेस्टॉरंट चांगले बनते आणि लोक तिथे येतात, पण जरा विचार करा, जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तिथल्या सुविधा अगदी शून्य आहेत, कर्मचारी तुमचा अपमान करतात, तर तुम्हाला पुन्हा त्या हॉटेलमध्ये जायला आवडेल का? तुमचे उत्तर नक्कीच नाही असेल, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लंडनमध्ये असेच एक हॉटेल आहे, जिथे सुविधा उपलब्ध नाहीत आणि पैसे अनादराने आकारले जातात, तरीही लोक तिथे जातात.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या हॉटेलमध्ये पैसे घेऊनही ग्राहकांशी गैरवर्तन केले जाते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहक हा अपमान शांतपणे सहन करतात. इथल्या हॉटेल कर्मचाऱ्यांना काहीही म्हणणे म्हणजे आणखी अपमान. जर तुम्ही असा विचार करत असाल की ते स्वतःच्या इच्छेने हे करतात, तर तुम्ही चुकीचे आहात. कर्मचारी त्यांच्या स्वेच्छेने लोकांचा अपमान करत नाहीत, उलट ग्राहकांचा अपमान केल्याबद्दल त्यांना मोबदलाही मिळतो. हे हॉटेल बर्नेट, लंडन येथे आहे आणि ‘केरेन्स हॉटेल’ म्हणून ओळखले जाते. येथील एका रात्रीचे भाडे सुमारे 20 हजार रुपये आहे.

पूर्वी हे हॉटेल एक रेस्टॉरंट होते, मात्र आता त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांचा खाण्याबरोबरच अपमान केला जातो. पाहुण्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी मागितले, तरी त्यांना स्वतः सिंकमधून पाणी घेण्यास सांगितले जाते. वेटर जेवणाच्या ताट ग्राहकांच्या दिशेने फेकतात आणि काहीवेळा अत्यंत उद्धटपणे त्यांच्याकडून अन्न हिसकावून घेतात. येथे येणाऱ्यांना टॉवेल, टॉयलेट रोल किंवा मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे हॉटेलवाले स्वतःला जगातील सर्वात वाईट हॉटेल म्हणून जाहिरात करतात.