जॅकपॉटमध्ये 2,800 कोटी रुपये जिंकल्यानंतर, केला एक फोन आणि एका क्षणात झाला कंगाल


अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये एका व्यक्तीने 2,800 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. पण दुस-याच दिवशी त्याला कळाले की तो कंगाल झाला आहे. कारण कंपनीने आपली चूक झाल्याचे सांगत लॉटरीची रक्कम देण्यास नकार दिला. खरा विजेता दुसरा कोणीतरी होता. हे ऐकून लॉटरी विजेत्याला धक्काच बसला, पण नंतर त्याने त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, जॉन चीक्स नावाच्या व्यक्तीने पॉवरबॉलमधून 6 जानेवारी 2023 रोजी लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या वेबसाईटवर निकाल आला, तेव्हा चीक्सने पाहिले की त्याचा तिकीट नंबरही तोच होता. त्याने 2,800 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता. हे पाहून त्याने आनंदाने उडी मारली. लॉटरीचे पैसे जमा करण्यासाठी चीक्सने कंपनीशी संपर्क साधला असता, त्यांचा नंबर चुकून वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्याचे सांगितले. त्यामुळे ही रक्कम त्याला देता येणार नाही.

चीक्सने सांगितले की त्याने आधीच वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या त्याच्या तिकीट क्रमांकाचा फोटो घेतला आहे. दुसऱ्या दिवशी विजयी रक्कम घेण्यासाठी तो लॉटरी कार्यालयात गेला. मात्र तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत चीक्सने सांगितले की, लॉटरी ऑफिसमध्ये त्याला तिकीट डस्टबिनमध्ये टाकण्यासही सांगण्यात आले होते.

पण चीक्सने तिकीट ठेवले आणि वकिलाच्या मदतीने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला. त्याने पोलिसात गुन्हा दाखल केला. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्याचे वकील, रिचर्ड इव्हान्स, असा युक्तिवाद करतात की विजयी संख्या मिस्टर चीक्सच्या क्रमांकाशी जुळत असल्याने, त्याला संपूर्ण जॅकपॉट मिळायला हवा. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 फेब्रुवारीला होणार आहे.