यशस्वी जैस्वालच्या धक्क्यामुळे या क्रिकेटपटूंची कारकीर्द संपुष्टात! एकाला मानले जात होते भावी सुपरस्टार


भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. या खेळीमुळे इंग्लंड आता या सामन्यात खूप मागे आहे, तर भारतीय संघाला 322 धावांची आघाडी मिळाली आहे. या मालिकेत यशस्वी जैस्वालने ज्याप्रकारे खळबळ माजवली आहे, त्यामुळे टीम इंडियात त्याचा मुक्काम निश्चित झाला आहे आणि सगळे त्याला सुपरस्टार म्हणू लागले आहेत.

22 वर्षीय यशस्वी जैस्वालने आपल्या छोट्या कारकिर्दीत 3 शतके झळकावली आहेत आणि तीन कसोटी शतके झळकावणाऱ्या सर्वात वेगवान भारतीयांच्या यादीतही तो सामील झाला आहे. अशा स्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालचे स्थान पक्के होताना दिसत असताना, जैस्वालमुळेच आता टीम इंडियामध्ये ज्यांच्यासाठी एन्ट्रीचे दरवाजे बंद होताना दिसू लागले आहेत. अशाच काही नावांवर एक नजर टाकूया…

पृथ्वी शॉ : 24 वर्षीय पृथ्वीने भारतासाठी 5 कसोटी सामने खेळले आहेत, त्याने 2020 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. दुखापतीमुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता, नुकतेच त्याचे पुनरागमन झाले आहे. अशा परिस्थितीत त्याचे टीम इंडियात पुनरागमन करणे, सध्या कठीण दिसत आहे.

मयंक अग्रवाल: 33 वर्षीय मयंक एकदा भारताचा सलामीवीर बनला होता, पण तो 2022 पासून संघाबाहेर आहे. मयंकने भारतासाठी 21 कसोटी सामने खेळले असून, त्याच्या नावावर 4 शतकेही आहेत. पण आता रोहित-जैस्वाल ही जोडी पक्की झाली असल्याने त्याचा मार्ग सोपा नाही.

अभिमन्यू इसवरन: 28 वर्षीय अभिमन्यूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत, त्याला टीम इंडियाने दोन-तीन वेळा बोलावले होते. पण तो केवळ संघात सामील होऊ शकला, त्याला प्लेइंग-11 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. आता टीम इंडियामध्ये अनेक सलामीवीर असल्याने त्याचे पुनरागमनही शक्य नाही.

या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, यशस्वी जैस्वालने आतापर्यंत केवळ 6 डावात 435 धावा केल्या आहेत, जी कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. यशस्वी जैस्वालने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त 7 कसोटी सामने खेळले आहेत, त्याची सरासरी 60 च्या आसपास आहे. यामध्ये त्याने एक द्विशतक, दोन शतके झळकावली आहेत आणि कसोटी फॉरमॅटमध्येही तो टीम इंडियाच्या वतीने प्रतिस्पर्ध्यांवर प्रतिहल्ला करण्यात प्रभावी ठरत आहे.