पोलिस तपासात कोणताही गुन्हा घडलेला असेल तर सर्वप्रथम फिंगरप्रिंटचा तपास केला जातो. गुन्हेगाराने गुन्हा करताना कोणताही माग मागे सोडलेला नसेल तरी त्याच्या बोटांचे ठसे त्याची ओळख पटवू शकतात हे आपण जाणतो. जगात प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात व यामुळेच बोटांच्या ठशांवरून गुन्हेगाराची ओळख पटविणे सोपे जाते. अर्थात माणसाची ओळख केवळ बोटांच्या ठशांवरूनच करता येते असे मात्र नाही. आपल्या शरीरातील अनेक अवयवही अशी ओळख पटविण्यास मदत करू शकतात.
आपल्या शरीरातील हे अवयवही पटवितात आपली ओळख
डोळ्यांच्या बाहुल्या किंवा आयरिस याही माणसाची ओळख पटवू शकतात. डोळे हे केवळ पाहण्यासाठी नाहीत तर ते आपली ओळख पटविणार्या खिडक्याही आहेत. डोळ्यातील बाहुलीचे मुख्य काम जी वस्तू पाहायची तिच्यापासून आलेली किरणे व प्रकाश डोळ्यात किती गेला पाहिजे यावरचे नियंत्रण ठेवणे हे आहे. डीएनए नुसार प्रत्येक माणसाच्या डोळ्याच्या बाहुल्या युनिक असतात. इतकेच नव्हे तर एकाच माणसाच्या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्याही वेगळ्या असू शकतात. यामुळेच आता स्मार्टफोन लॉक करताना आयरिस फिचर त्यात आले आहे. अनेक देशात परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या डोळ्याचे स्कॅनिंग केले जाते तेही त्यासाठीच.
कान- प्रत्येक माणसाच्या कानाची बनावट तसेच आकार वेगवेगळा असतो. ब्रिटीश संशोधकांनी कानाच्या कर्व्हवरून माणसाची खरी ओळख पटविण्याची शक्यता ९९.६ टक्के असते असे सिद्ध केले आहे. याहू आता असे तंत्र विकसित करत आहे की ज्यामुळे कानाच्या सहाय्याने स्मार्टफोन अनलॉक करता येतील.
आवाज हा मानवी शरीराचा अवयव नाही मात्र प्रत्येक माणसाचा आवाज ही अत्यंत महत्त्वाची ओळख ठरू शकते.त्यामुळेच आपण एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहात नसलो तरी तिच्या आवाजावरून तिला ओळखू शकतो. आता अशा प्रकारची अनेक अॅप्स आली आहेत ज्यात डिव्हाईस अनलॉक करताना आवाजाचा वापर केला जातो.
जीभ- फिंगरप्रिंट इतकेच जीभ हेही माणसाची ओळख पटविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. जीभेचा आकार व टेक्श्चर कधीच बदलत नाही. त्यामुळे जीभेची प्रिंटही ओळख पटविताना महत्त्वाची ठरतात. वैज्ञानिकांनी ओळखीसाठी थ्रीडी टंग इमेजिंग डिव्हाईस तयार केले आहे त्यावरून आता व्यक्तीची ओळख पटविणे सहज सोपे झाले आहे.
ओठ- ओठांचे ठसे हेही माणसाची ओळख पटविण्यासाठी पुरेसे ठरतात. एखादा किस आपली ओळख पटविण्यासाठी डिटेक्टीव्हला पुरेसा ठरतो असे म्हणतात.जर्नल ऑफ फोरेन्सिक डेंटल सायन्स मध्ये संशोधकांनी प्रत्येकाच्या ओठाचे प्रिंट वेगळे येते यावरचे संशोधन प्रसिद्ध केले आहे.
दांत-दातांच्या सहाय्याने डीएनएची ओळख पटविता येते इतकेच नव्हे तर माणसाच्या अनेक सवयीही माहिती होतात. म्हणजे तुम्ही कांहीही खाताना दातांचा किती दाब देता, एखादे वाद्य वाजविता काय हेही ओळखता येते. दातांची रचना ही सारी माहिती एकत्र करण्यास उपयुक्त ठरते. अगदी आयडेंटिकल ट्वीन्स म्हणजे एकसारख्या जुळ्यांच्या दातांची रचनाही वेगळी असते.
पायाचा अंगठा- बोटांच्या ठशांप्रमाणेच प्रत्येकाचा पायाच्या अंगठ्याचे ठसे वेगळे असतात असे म्हणतात. एका चोरीच्या केसमध्ये चोराने कांहीच माग मागे ठेवला नव्हता तेव्हा त्याच्या पायाच्या अंगठ्याच्या ठशांवरून पोलिसांनी त्याला पकडले व न्यायालयाने ते ग्राह्य मानून चोराला शिक्षा सुनावल्याची घटना घडली आहे.