प्रत्येक भारतीय घरांत हमखास सापडणारा बहुगुणी व बहुपयोगी प्रकार म्हणजे गुलाबजल. सर्वसाधारणपणे हळदीकुंकवांसारख्या अथवा लग्नकार्यासारख्या समारंभात गुलाबपाणी अंगावर शिंपडून स्वागत करण्याची पद्धत आहे. हे गुलाबजल ब्युटी मॅजिक म्हणूनही प्रसिद्ध आहे. केवळ भारतीय नव्हे तर जगभरातील सुंदर स्त्रियांचे गुलाबजल हे सौंदर्य गुपित आहे. इजिप्तची राणी क्लिओपात्रा तिच्या ब्युटी ट्रीटमेंटमध्ये गुलाबजलाचा वापर करत असल्याचे संदर्भ सापडतात.
बहुउपयोगी गुलाबजल
गुलाबजल हे त्वचेचा पीएच बॅलन्स कायम राखण्याचे काम करते तसेच तेलकट त्वचेला आळा घालते. त्वचेवर सूज आली असेल तर ती कमी करून त्वचेची लालीही कमी करते. मुरूम पुटकुळ्या, इसब या सारख्या त्वचाविकारांमध्ये ते क्लिनझर म्हणून उपयुक्त आहे. त्वचेची रंध्रे मोकळी करून त्वचेला नवजीवन देण्याचे तसेच उजळ बनविण्याचे कामी ते उपयुक्त आहे.
गुलाबजल अँटीबॅक्टेरियल आहे. त्यामुळे त्वचेवर उमटलेले चरे, जखमा, कापण्यामुळे झालेल्या जखमा बर्या होण्यास मदत मिळते. गुलाबजलाचा सुगंध हा उत्तम मूडचेंजर आहे. नुसत्या सुगंधानेही रिलॅक्स वाटते व नैराश्य कमी होते. केसातील कोंडा, त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास ते उपयोगी आहे शिवाय केसांची चांगली वाढ होण्यासही ते मदत करते. हे उत्तम कंडीशनर आहे. झोपताना त्याचे कांही थेंब उशीवर टाकले तर चांगली झोप येते. याचा नियमित वापर वार्धक्य दूर ठेवण्यासाठी होतो.
ज्यांच्या त्वचेवर सुरकुत्या येऊ लागल्या असतील त्यांनी रात्री गुलाबजलाचा वापर त्वचेवर केला तर दिवसभर चेहरा तजलेलदार दिसतो. मेकअपवरही ते स्प्रे बॉटलमधून उडविता येते. ग्लीसरीन व गुलाबजल समप्रमाणात घेऊन कापसाने डोक्याच्या त्वचेवर चोळून लावावे नंतर १० मिनिटांना शांपू केल्यास केस चमकदार बनतात. डोळ्याचा थकवा दूर करण्यासाठी कापूस गुलाबजलात भिजवून डोळ्यावर ठेवल्यास थकवा दूर होतो.
एक चमचा लिंबू रस व गुलाबजल एकत्र करून मुरूम पुटकळ्यांवर लावून अर्धा तास ठेवावे व नंतर चेहरा धुवावा. मुलतानी माती व गुलाबजलाचा लेप तयार करून तोंडावर फेसपॅकप्रमाणे लावावा नंतर धवून टाकावे. तजेलदार, ताजातवाना चेहरा मिळतो. डाळीच्या पीठात गुलाबजल व लिंबू रस घालून चेहरा धुतल्यास त्वचा उजळ होते. पाण्यात गुलाबजल टाकून अंघोळ केली तर स्ट्रेस दूर होतो.
अर्थात गुलाबजल खरेदी करताना खात्रीच्या ठिकाणाहून त्याची खरेदी करावी.