ज्या दिग्गज क्रिकेटपटूने आपल्या संघाला कधीही हरु दिले नाही, पाकिस्तानने केली बेईमानी, तेव्हा त्याला धडा शिकवला, त्याच खेळाडूचा रुग्णालयात मृत्यू


क्रिकेटमध्ये असे फार कमी खेळाडू असतील, ज्यांना आपल्या देशाच्या संघासाठी खेळलेल्या सर्व सामन्यांमध्येही पराभवाला सामोरे जावे लागले नसेल. अष्टपैलू माईक प्रॉक्टर हे या प्रकारात मोडणारे खेळाडू होते. दक्षिण आफ्रिकेच्या या महान क्रिकेटपटूचे 17 फेब्रुवारी 2024 रोजी डर्बन येथील रुग्णालयात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. असे सांगितले जात आहे की माइक प्रॉक्टर यांना हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान काही समस्या आल्या, त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रॉक्टर यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

माईक प्रॉक्टर यांची गणना दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते. त्यांनी 1967 ते 1970 दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी 7 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 226 धावा केल्या त्याचबरोबर 41 विकेट्सही घेतल्या. त्यांनी अवघ्या 7 कसोटीत 15.02 च्या सरासरीने 41 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेने 3 वर्षात खेळलेल्या 7 कसोटींपैकी एकाही कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला नाही. दक्षिण आफ्रिकेने 7 पैकी 6 कसोटी जिंकल्या. तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. माईक प्रॉक्टर यांची सर्वोत्तम गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेसाठीच्या त्यांच्या शेवटच्या कसोटीत दिसून आली, जेव्हा त्यांनी पोर्ट एलिझाबेथमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 73 धावांत 6 बळी घेतले आणि त्यांच्या संघाने 323 धावांनी विजय मिळवला.

माईक प्रॉक्टर यांच्या पत्नी, ज्या आपल्या काळातील प्रसिद्ध टेनिस स्टार होत्या, त्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूशी संबंधित माहिती दक्षिण आफ्रिकन वेबसाइट न्यूज 24 ला दिली. त्यांनी सांगितले की हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान काही समस्या कशा आल्या, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या म्हणण्यानुसार, एकदा प्रॉक्टर बेशुद्ध झाले, तेव्हा त्यांना पुन्हा शुद्ध आली नाही.

प्रॉक्टर यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ॲलन डोनाल्डने त्याच्या प्रशिक्षकाला त्याच्याच शब्दात श्रद्धांजली वाहिली. तो म्हणाला की माईक प्रॉक्टर यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे.

माईक प्रॉक्टर 2002 ते 2008 या काळात ICC चे मॅच रेफरी देखील होते. पंच म्हणून त्यांचा कार्यकाळ वादांनी भरलेला होता. त्यांच्या कार्यकाळात निर्माण झालेला सर्वात मोठा वाद 2006 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या ओव्हल कसोटीत पाहायला मिळाला. या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला, त्यानंतर त्यांनी सामना खेळण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या या नकारानंतर सामना इंग्लंडच्या झोळीत आला. 2008 मध्ये हरभजन सिंगवर बंदी घालणारे रेफरी देखील माईक प्रॉक्टर होते.