पाकिस्तानी दिग्गजाची फसवणूक, 4 वर्षांचे आश्वासन दिल्यानंतर 2 महिन्यांत काढून टाकले नोकरीवरून


पाकिस्तान क्रिकेट बऱ्याचदा चर्चेत असते आणि ते पण चांगल्या कारणांमुळे नसते. विश्वचषकानंतर संघात प्रचंड गोंधळ उडाला होता आणि अवघे काही महिने उलटले, तेव्हा एक नवा गोंधळ माजला होता. पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक बनलेल्या मोहम्मद हाफिजला आता बडतर्फ करण्यात आले आहे. त्याला चार वर्षांचा करार देण्यात आला होता, मात्र दोन महिन्यांत त्याला काढून टाकण्यात आले आहे.

मोहम्मद हाफीजने सोशल मीडियावर जाहीर केले की तो पूर्वीप्रमाणे पीएसएलमध्ये एका वृत्तवाहिनीसोबत काम करणार आहे आणि आता पाकिस्तान संघासोबत संचालक म्हणून त्याचा प्रवास संपला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा अध्यक्ष मिळाल्याने आणि बोर्डाची कमान मोहसन नक्वी याच्या हाती आल्याने हा प्रकार घडला आहे.

मोहम्मद हाफीजने ट्विटरवर लिहिले की, पीसीबीने जेव्हा मला चार वर्षांसाठी संचालकपदाची ऑफर दिली, तेव्हा मी ते मोठ्या आनंदाने आणि आदराने स्वीकारले. मात्र आता तो दोन महिन्यांत संपला आहे, कारण नवे अध्यक्ष आले आहेत. मोहम्मद हाफिजने केवळ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाकिस्तान संघासोबत डायरेक्टर म्हणून काम केले होते.

एकदिवसीय विश्वचषकातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्यात आले, कोचिंग स्टाफपासून ते निवडकर्त्यापर्यंत बदल करण्यात आले. पण आता पीसीबीला नवा अध्यक्ष मिळाल्याने आणि पाकिस्तानमध्ये नवे सरकार येत असल्याने त्याचा परिणाम पाकिस्तान क्रिकेटवरही होत आहे.

मोहम्मद हाफीज संचालक झाल्यानंतर, पाकिस्तानला काही चांगले परिणाम मिळाले नाहीत, कारण संघाला प्रथम ऑस्ट्रेलिया आणि नंतर न्यूझीलंडमध्ये अत्यंत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. आता ही कारवाई केवळ संचालकावर थांबणार की पाकिस्तान संघाचा कर्णधार, निवडक आणि अन्य अधिकारीही बदलणार का, हे पाहायचे आहे.