टीम इंडियाला झटका, अश्विन तिसऱ्या कसोटीतून बाहेर, काय आहे कारण?


भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी 500 कसोटी बळी घेत इतिहास रचणारा रविचंद्रन अश्विन या सामन्यातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, कुटुंबातील वैद्यकीय आणीबाणीमुळे अश्विन सामना अर्धवट सोडून आपल्या घरी रवाना झाला आहे.


याचा अर्थ टीम इंडिया शनिवारी मैदानात उतरेल, तेव्हा अश्विन नसेल आणि त्याच्या जागी पर्यायी खेळाडू मैदानात उतरेल. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या ट्विटनुसार, रविचंद्रन अश्विनच्या आईची तब्येत बिघडली आहे आणि त्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून चेन्नईला जावे लागले.


बीसीसीआयने जारी केलेल्या प्रकाशनात असे लिहिले आहे की, रविचंद्रन अश्विनला तत्काळ कसोटी संघातून बाहेर करण्यात आले आहे, कारण त्याच्या कुटुंबात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली आहे. या कठीण काळात बीसीसीआय पूर्णपणे रविचंद्रन अश्विनच्या पाठीशी उभी आहे. बोर्ड अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल.

यावेळी बोर्ड अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करते आणि कठीण काळात त्यांच्यासोबत असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. बोर्ड आणि टीम इंडियाकडून अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. यावेळी सर्व चाहते आणि माध्यमांनी गोपनीयतेचा आदर करावा, अशी टीम इंडियाची अपेक्षा आहे.

भारतीय संघाला यावेळी रविचंद्रन अश्विनची खूप गरज होती. राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने आपल्या डावात 445 धावा केल्या आहेत, प्रत्युत्तरात इंग्लंडने अवघ्या 35 षटकांत 207 धावा केल्या आहेत. अश्विनने दुस-या दिवशी कसोटी फॉरमॅटमध्ये आपल्या पाचशे विकेट्स पूर्ण केल्या, पण आता तो आगामी तीन दिवस टीम इंडियासोबत नसेल. भारतीय संघ आता कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 10 खेळाडू आणि एक बदली खेळाडू घेऊन मैदानात उतरणार आहे.