जॅकलिन फर्नांडिसने मागे घेतली महाठग सुकेश चंद्रशेखरविरोधात दाखल केलेली तक्रार, केला होता धमकी दिल्याचा आरोप


200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव जोडले गेले, तेव्हापासून ती दररोज ठळक बातम्यांचा भाग बनत आहे. नुकतेच जॅकलीनने सुकेशवर सतत पत्र पाठवून धमकावत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी अभिनेत्रीने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे जाऊन सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

ताज्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. धमक्यांसारखे गंभीर आरोप केल्यानंतर जॅकलीन फर्नांडिसने आपली तक्रार मागे घेणे, हे सर्वांच्याच समजण्यापलीकडे आहे. एवढेच नाही तर तिच्याशी संबंधित कोणतेही पत्र सार्वजनिक करू नये, अशी मागणी या अभिनेत्रीने केली आहे. जॅकलिनचा हा यू-टर्न लोकांना आश्चर्यचकित करत आहे.

जॅकलीन फर्नांडिसच्या याचिकेबाबत पटियाला हाऊस कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अभिनेत्री जॅकलिनने केलेला अर्ज मागे घेत आहे आणि हे प्रकरण निकाली काढले आहे. या प्रकरणाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. जॅकलिनचे गँगस्टर सुकेशसोबतचे संबंध उघड झाल्यानंतर 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने तिची सुमारे 10 तास चौकशी केली.

एवढेच नाही, तर या प्रकरणानंतर जॅकलिन फर्नांडिसवर अनेक निर्बंधही लादण्यात आले होते. न्यायालयाने तिला देश सोडण्यासही बंदी घातली होती. या प्रकरणात अभिनेत्रीचे नाव आल्यावर त्याचा परिणाम तिच्या कामावरही होऊ लागला. नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ या चित्रपटातून जॅकलिनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याचवेळी सुकेश चंद्रशेखर जेलमधून जॅकलिनला रोज पत्र लिहित असतो.