राजकोट कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर, बेन स्टोक्सने फ्लॉप खेळाडूला दिली संधी


भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. मोठी बातमी म्हणजे या सामन्यासाठी इंग्लंडने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. धक्कादायक निर्णय घेत इंग्लंडने पहिल्याच सामन्यात खराब झालेल्या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली आहे. इंग्लंडने वेगवान गोलंदाज मार्क वुडला संघात स्थान दिले आहे. हा वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीत खेळला आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. यानंतर त्याला विशाखापट्टणम कसोटीत वगळण्यात आले. इंग्लंडचा संघ एका वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसह दुसऱ्या कसोटीत उतरला होता, पण राजकोट कसोटीसाठी त्यांनी दोन वेगवान गोलंदाजांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. स्टोक्सने ऑफस्पिनर शोएब बशीरला संघातून वगळले आहे.

इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन – जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

बेन स्टोक्सने राजकोट कसोटीसाठी रोहित शर्माच्या चालीचा वापर केला आहे. टीम इंडिया मालिकेच्या पहिल्या सामन्यापासून दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे. तर इंग्लंडने पहिल्या दोन सामन्यांमध्ये फक्त एकच वेगवान गोलंदाज मैदानात उतरवला होता. मात्र, आता इंग्लंडने राजकोटमध्ये आपली रणनीती बदलली आहे. राजकोटची खेळपट्टी रँक टर्नर ठरणार नाही, असे सांगितले जात आहे. येथे सर्व गोलंदाजांसाठी काहीतरी असेल. विशेषत: वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळू शकते आणि मार्क वुडचा वेग इंग्लंडसाठी उपयुक्त ठरू शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंग्लंडचा संघ राजकोटमध्ये केवळ दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे.

इंग्लंडच्या संघात बदल करण्यात आला असून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. वृत्तानुसार, रवींद्र जडेजाला संघात संधी मिळणार आहे. त्याचवेळी ध्रुव जुरेल आणि सरफराज राजकोटमध्ये खेळणार हे निश्चित मानले जात आहे.