अशोक चव्हाणांना चोवीस तासात मिळाले गिफ्ट, भाजपने दिले राज्यसभेचे तिकीट


भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसंदर्भात आणखी एक यादी जाहीर केली आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा गुजरातमधून राज्यसभेवर जाणार असून, पक्षाने महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. नड्डा आणि चव्हाण यांच्याशिवाय या यादीत आणखी 5 जणांची नावे आहेत.

जगत प्रकाश नड्डा यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाने गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि जशवंत सिंग सलामसिंग परमार यांना राज्यसभेचे तिकीट दिले आहे. अशोक चव्हाण यांच्याशिवाय महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी आणि अजित गोपघडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. अशाप्रकारे तिसऱ्या यादीत पक्षाने एकूण 7 जणांना राज्यसभेची तिकिटे दिली आहेत.

भाजपने महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन आणि नारायण राणे यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून उभे केले नाही. तर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रुपाला यांची नावे गुजरातच्या राज्यसभेच्या यादीत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत भाजप मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रुपाला यांना उमेदवारी देऊ शकते.

भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत एकूण 14 जणांची नावे होती. पहिल्या यादीत पक्षाने उत्तर प्रदेशातील 7 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. हे 7 लोक होते- सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग, तेजवीर सिंग, साधना सिंग, संगीता बलवंत, नवीन जैन आणि अमरपाल मौर्य. भारतीय जनता पक्षाच्या या सात नेत्यांशिवाय भाजपने डॉ. धरमशीला गुप्ता आणि भीम सिंह यांना बिहारमधून उमेदवारी दिली होती.

याशिवाय पक्षाने छत्तीसगड, उत्तराखंड, हरियाणा, कर्नाटक आणि पश्चिम बंगालसाठी 5 जणांची यादी जाहीर केली होती. पक्षाने छत्तीसगडमधून राजा देवेंद्र प्रताप सिंह, उत्तराखंडमधून महेंद्र भट्ट, हरियाणातून सुभाष बराला, कर्नाटकातून नारायण कृष्णसा भंडगे, पश्चिम बंगालमधून समिक भट्टाचार्य यांना राज्यसभेची तिकिटे दिली आहेत.

भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत 5 नेत्यांना तिकीट दिले होते. पक्षाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना ओडिशातून, माया नरोलिया आणि एल मुरुगन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी दिली. तसेच मध्य प्रदेशातून बन्सीलाल गुर्जर आणि उमेशनाथ महाराज यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.