करोडोंची लॉटरी, समाजसेवेची तळमळ आणि नेतृत्व… मुंबई शूटआऊटच्या मॉरिस नोरोन्हा याची कहाणी आहे खूपच फिल्मी


8 फेब्रुवारी 2024… मुंबईतील दहिसर परिसर, महाराष्ट्र… येथे आयसी कॉलनीत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्ह करत होते. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोन्हा होता. फेसबुक लाईव्ह संपणार इतक्यात अचानक गोळीबाराचा आवाज आला. फेसबुक लाईव्हमध्ये अभिषेकच्या पोटावर आणि खांद्यावर दोन गोळ्या लागल्याचे दिसून आले, पोटावर हात ठेवून ते तेथून निघून गेले. यानंतर फेसबुक लाईव्ह बंद झाले.

लगेच बातमी आली की अभिषेक यांची हत्या इतर कोणी नाही, तर मॉरिसने केली आहे, जो त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करत होता. एवढेच नाही, तर मॉरिसने स्वतःवरही चार गोळ्या झाडल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यान अभिषेक यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला. तसेच या घटनेवरून महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली होती.

सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोन्हा याचे अभिषेक यांच्यासोबत वैर असल्याचे समोर आले. बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसराच्या भल्यासाठी आपसी वाद संपवून, ते दोघे एकत्र आले आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी फेसबुक लाइव्ह होते. पण मॉरिसच्या मनात काय चालले आहे, हे अभिषेक यांना कळालच नाही. मॉरिसच्या विनंतीवरून त्यांनी फेसबुक लाईव्ह करण्याचे मान्य केले. पण यानंतर त्यांचे काय होणार, हे त्यांना माहीत नव्हते.

सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या गोळीबार आणि आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व गुन्हे शाखेचे डीसीपी राजतिलक रोशन करणार आहेत. गुन्हे शाखा युनिट 12 आणि 11 चे अधिकारी या तपास पथकाचा भाग असतील. गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी सुरू आहे.

ताब्यात घेतलेल्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती मॉरिसचा पीए असल्याचे सांगितले जाते, जो नेहमी त्याच्यासोबत असतो. तो मॉरिसचा अंगरक्षकही होता. याशिवाय मॉरिसने वैयक्तिक सशस्त्र अंगरक्षकही ठेवले होते. मेहुल पारिख असे ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मेहुल पारीख घटनास्थळी उपस्थित होता. मॉरिसकडे कोणतेही परवाना असलेले पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर नसल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे. गोळीबार कोणत्या शस्त्राने झाला याचा तपास सुरू आहे. हे पिस्तूलही मॉरिसच्या अंगरक्षक मेहुलचे असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

यासोबतच मॉरिसचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांच्या फायलींमध्ये मॉरिसवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर धमकी, मारहाण, फसवणूक आणि अगदी बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. मॉरिस तुरुंगातही गेला होता. त्याच्यावर 80 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तो तुरुंगातही गेला होता. मॉरिसविरुद्ध आयपीसीच्या कलम 307 अन्वये खटलाही प्रलंबित आहे.

पण गुन्हेगारीच्या जगाव्यतिरिक्त, त्याची प्रतिमा देखील चांगली होती. जेव्हा देशात कोरोनाची लाट होती, त्यावेळी मॉरिसने अनेकांना मदत केली होती. त्यांच्या समाजसेवेने प्रभावित होऊन, मुंबईच्या महापौर आणि ठाकरे गटच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि अगदी राज्यपालांनी त्याचा कोविड योद्धा म्हणून गौरव केला होता. मॉरिसच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सन्मानित झाल्याची अनेक छायाचित्रे आहेत. जे आता या गोळीबार आणि आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा व्हायरल होत आहे.

या कामांनंतर मॉरिस याने दहिसर परिसरात स्वत:ला नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा विचार केला. पण हा मार्ग त्याच्यासाठी सोपा नव्हता. कारण या भागात ठाकरे गटाच्या घोसाळकर कुटुंबाचा दबदबा होता. 40 वर्षीय अभिषेक स्वत: नगरसेवक आणि वडील आमदार राहिले आहेत. अशा स्थितीत त्यांचे घोसाळकरांशी असलेले वैर स्पष्टपणे दिसून येत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वैरामुळे आगामी निवडणुकीत दोघेही एकमेकांसमोर उभे राहणार होते. अशा स्थितीत हे वैर संपवून नवी सुरुवात करू, असे सांगून मॉरिसने अभिषेकला आपल्या कार्यालयात बोलावले आणि फेसबुक लाईव्हदरम्यान त्यांच्यावर गोळी झाडली. मॉरिसच्या कार्यालयाबाहेर त्याचे नाव मॉरिस भाई असे लिहिलेले आहे. त्याने स्वत:चे कोविड योद्धा म्हणूनही वर्णन केले आहे.

ज्याला ते देवाचे दूत आणि समाजसेवक मानत होते, ती व्यक्ती कोणाचा तरी खून करून आपल्या प्राणाची आहुती देऊ शकते, यावर लोक विश्वास ठेवू शकत नाहीत. पण असे काही लोक आहेत, जे म्हणतात की मॉरिस मानसिकदृष्ट्या आजारी होता. तो गुन्हेगार होता. त्याचबरोबर या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण सील करण्यात आले आहे.

मॉरिसच्या मृत्यूनंतर त्याच्या अनेक कथा आता समोर येत आहेत. मॉरिस एकेकाळी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. त्याला लॉटरीची आवड होती. तो अनेकदा लॉटरी खेळायचा. काही वर्षांपूर्वी त्याने करोडोंची लॉटरी जिंकली, त्यानंतर त्याचे आयुष्य एका रात्रीत बदलले. प्रथम त्याला ऐशोआराम, नंतर समाजसेवा आणि नंतर नेता बनण्याची आवड निर्माण झाली. असे म्हटले जाते की मॉरिस याला नेता बनण्याची इतकी आवड होती की जेव्हा तो घरातून किंवा कार्यालयातून बाहेर पडायचा, तेव्हा तो ऑटोचालक आणि जवळपासच्या दुकानदारांना 500-500 रुपयांच्या नोटांचे वाटप करायचा. समाजात स्वतःला नेता म्हणून दाखवण्याची त्याला आवड होती.