IND vs ENG कसोटी मालिकेदरम्यान टी-20 लीग खेळण्यासाठी गेला हा खेळाडू, इंग्लंडचा धक्कादायक निर्णय


भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही कसोटी सामन्यांचे निकाल लागल्यानंतर आता राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे लक्ष लागले आहे. विशाखापट्टणम येथे खेळलेली दुसरी कसोटी 5 फेब्रुवारी रोजी संपली. अशा स्थितीत दोन्ही संघ सध्या ब्रेकवर आहेत. या ब्रेकचा फायदा घेत इंग्लंडचा संघ भारताच्या बाहेर गेला. इंग्लंडचे खेळाडू या सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच त्यांच्या संघातील एका फलंदाजाने संधीचा फायदा घेत टी-20 लीग खेळायला गेला आहे. इंग्लंडचा हा खेळाडू आहे डॅन लॉरेन्स.

विशाखापट्टणम कसोटी संपल्यानंतर, इंग्लिश संघ दुस-याच दिवशी अबुधाबीला पोहोचला, जिथे त्याचे खेळाडू काही दिवस विश्रांती घेत आहेत आणि स्वतःला रिचार्ज करत आहेत. येथेही संघाचा फलंदाज डॅन लॉरेन्स ब्रेक घेण्याऐवजी क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यामुळेच UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या ILT20, T20 टूर्नामेंटचा संघ डेझर्ट वायपर्समध्ये सामील झाला आहे.

ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट संघ व्यवस्थापनाने या ब्रेकदरम्यान लॉरेन्सला टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली. अशा परिस्थितीत लॉरेन्स ILT20 मध्ये वायपर्ससाठी आणखी 2 सामने खेळू शकेल. वायपर्सचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनीही लॉरेन्सच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. लॉरेन्स शुक्रवार 9 फेब्रुवारी आणि रविवारी 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यांमध्ये भाग घेईल आणि त्यानंतर पुन्हा इंग्लिश संघासोबत सामील होईल. इंग्लंडच्या कसोटी संघात सामील होण्यापूर्वी लॉरेन्स त्याच टी-20 लीगमध्ये खेळत होता, परंतु केवळ एका सामन्यानंतर त्याला इंग्लंडकडून फोन आला.

लॉरेन्सची सुरुवातीला इंग्लंड संघात निवड झाली नव्हती. त्यानंतर, युवा फलंदाज हॅरी ब्रूकने वैयक्तिक कारणांमुळे अचानक आपले नाव मागे घेतल्यानंतर लॉरेन्सला इंग्लंडमधून फोन आला. मात्र, आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये तो खेळू शकला नाही आणि तो फक्त बेंचवर बसला आहे. सध्या त्याला तिसऱ्या कसोटीतही खेळणे अवघड आहे, कारण इंग्लिश संघ आपल्या फलंदाजीत बदल करण्याची शक्यता कमी आहे.