पाकिस्तानी खेळाडूचा कट यशस्वी झाला असता, तर अनिल कुंबळे रचू शकला नसता इतिहास


जागतिक क्रिकेटच्या इतिहासात, विशेषतः भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 7 फेब्रुवारीला विशेष स्थान आहे. हीच ती तारीख आहे, जेव्हा असा आश्चर्यकारक चमत्कार घडला होता, जो क्रिकेटच्या इतिहासात फक्त एकदाच घडला होता, तोही खूप वर्षांपूर्वी. त्या दिवशी पाकिस्तानी खेळाडूचा कट यशस्वी झाला असता, तर हा चमत्कार घडला नसता. बरोबर 25 वर्षांपूर्वी, जेव्हा भारताचा महान लेगस्पिनर अनिल कुंबळेने दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानी फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले, तेव्हा संपूर्ण क्रिकेट जग या इतिहासाचे साक्षीदार झाले.

7 फेब्रुवारी 1999 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळला गेला. चेन्नईच्या हृदयद्रावक पराभवानंतर भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडला होता. अशा स्थितीत पुनरागमन करण्यासाठी त्याला विजय आवश्यक होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 252 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 172 धावांवर गडगडला. कुंबळेने पहिल्या डावात सर्वाधिक 4 बळी घेतले होते. पहिल्या डावात 80 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 339 धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि पाकिस्तानला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते.

सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला भारताचा दुसरा डाव संपला आणि पाकिस्तानी संघ फलंदाजीला आला. शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांनी पहिल्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी करत भारताला विकेटसाठी झगडायला लावले. त्यानंतर कुंबळेने प्रथम आफ्रिदीची विकेट घेतली. इथून पुढे विकेट्सची झुंबड सुरू झाली आणि काही वेळातच कुंबळेने सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला. क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा एकाच गोलंदाजाने एका डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याच्या अनेक वर्षांपूर्वी इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जिम लेकरने हा पराक्रम केला होता. कुंबळेनंतर 2021 मध्ये न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध या पराक्रमाची पुनरावृत्ती केली होती.

कुंबळेच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या काही वर्षांनंतर, पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने एक खळबळजनक खुलासा केला होता, ज्याने त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज वकार युनूसच्या ‘खेळ भावने’वर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्या सामन्यात शेवटची जोडी म्हणून अक्रम आणि पाकिस्तानचा कर्णधार युनूस उपस्थित होते. वसीमने सांगितले की युनूसला स्वतः धावबाद व्हायचे होते, त्यामुळे कुंबळेला सर्व 10 विकेट्स मिळवता आल्या नसत्या आणि त्यामुळे तो इतिहास रचू शकला नसता. मात्र, वकारचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही आणि त्याच्या आधी वसीम कुंबळेचा बळी ठरला. वसीमच्या या खुलाशानंतर वकारला लाज वाटली, पण पाकिस्तानी दिग्गजाने हा आरोप फेटाळून लावला होता.