जसप्रीत बुमराहने घेतल्या 9 विकेट, ठरला सामनावीर, तरीही या बाबतीत ठरला अपयशी!


टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकली असून भारतीय संघाने हा सामना 106 धावांनी जिंकला आणि त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाच्या विजयात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलचा मोठा वाटा होता. जैस्वालने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. तर गिलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. मात्र जसप्रीत बुमराहनेही विजयात अप्रतिम योगदान दिले. या वेगवान गोलंदाजाने सामन्यात 9 विकेट घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 बळी घेतले आणि या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र, या कामगिरीदरम्यान त्याचा एक विक्रम हुकला आणि तीन वर्षांपूर्वी त्याला या अपयशाचाही सामना करावा लागला होता.

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध एकूण 91 धावांत 9 बळी घेतले. हे त्याचे इंग्लंडविरुद्धचे सर्वोत्तम आकडे आहेत. यापूर्वी 2023 मध्ये नॉटिंगहॅम कसोटीत त्याने इंग्लंडविरुद्ध 110 धावांत 9 विकेट घेतल्या होत्या. मात्र, एवढी उत्कृष्ट कामगिरी करूनही तो चेतन शर्माचा मोठा विक्रम मोडू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 10 बळी घेण्याचा विक्रम चेतन शर्माच्या नावावर आहे, जो त्याने 1986 मध्ये एजबॅस्टन कसोटीत केला होता. बुमराह दोनदा या विक्रमाच्या जवळ आला आणि दोन्ही वेळा तो एक विकेटने मागेच राहिला.

जैस्वाल आणि गिल यांनी अप्रतिम कामगिरी केली यात शंका नाही, पण जसप्रीत बुमराहनेच सामना टीम इंडियाकडे वळवला. बुमराहच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 253 धावांत गडगडला.

जसप्रीत बुमराहने भारतीय भूमीवर आपल्या यशाचे मुख्य कारण सांगितले. या खेळाडूने सांगितले की तो खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार आपला प्लॅन तयार करतो आणि मग त्यानुसार तयारी करतो. त्यामुळेच बुमराहला भारतीय खेळपट्ट्यांवरही यश मिळते. या कसोटी मालिकेतही त्याने 2 सामन्यात 15 बळी घेतले आहेत.