सचिन-द्रविडसोबत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूला पोलिसांनी केली अटक, प्रकरण आहे पैशाच्या अफरातफरीचे


चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांनी नागपुरात एका माजी क्रिकेटपटूला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या माजी क्रिकेटपटूने सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीनसोबत टीम इंडियासाठी क्रिकेट खेळले आहे. पण, नंतर माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांना जामीन मिळाला.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य विरोधात अजामीनपात्र वॉरंट आधीच जारी करण्यात आले होते. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आता ही अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 90 च्या दशकात भारतीय संघासाठी एक वनडे सामना खेळलेल्या वैद्यला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांनी त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले.

बजाज नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी सांगितले की, त्याने एका स्थानिक व्यावसायिकाकडून कथितपणे स्टील खरेदी केले होते आणि चेक जारी केला होता, जो बाऊन्स झाला होता, त्यानंतर त्या व्यावसायिकाने पैसे देण्याची मागणी केली.

त्याने सांगितले की क्रिकेटरने कथितपणे पैसे देण्यास नकार दिला म्हणून व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित न राहिल्याबद्दल त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. वैद्य सध्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट विकास समितीचे प्रमुख आहेत.

प्रशांत वैद्यच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 15 धावा आणि 4 विकेट आहेत. 54 वर्षीय प्रशांत वैद्य यांनी यापूर्वी विदर्भ आणि बंगाल या दोन्ही संघांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. जर आपण प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोललो तर त्याच्या नावावर जवळपास 1000 धावा आणि 170 विकेट आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रशांत वैद्यने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी जेवढे सामने खेळले आहेत, ते सर्व केवळ परदेशातच खेळले गेले आहेत.