Virat Kohli Return : विराट कोहली खेळणार नाही एकही कसोटी सामना? बीसीसीआयही आहे पुनरागमनाबद्दल अनभिज्ञ


इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. चांगल्या स्थितीत असूनही, भारतीय संघ हैदराबादमध्ये सामना जिंकू शकला नाही कारण चौथ्या डावात 231 धावांचे लक्ष्यही त्यांचे फलंदाज गाठू शकले नाहीत. आता भारताला पुढील सामन्यात पुनरागमन करावे लागेल, जेणेकरून मालिका जिंकण्याची शक्यता प्रबळ राहील. पराभवाशिवाय संघासाठी सध्यातरी कोणतीही चांगली बातमी येत नाही. रवींद्र जडेजा आणि केएल राहुलच्या दुखापतींनी संघाला धक्का दिला असून आता विराट कोहलीच्या पुनरागमनाबद्दलही शंका वाढली आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला होता, मात्र हैदराबाद कसोटीच्या 3 दिवस आधी बीसीसीआयने अचानक संघातून बाहेर पडण्याची घोषणा केली. कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे दोन्ही कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतल्याचे बोर्डाने सांगितले होते. कोहली तिसऱ्या कसोटीतून परतणार की नाही हे बीसीसीआयने त्यावेळी सांगितले नव्हते? हा प्रश्न अजूनही कायम आहे.

या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. तिसऱ्या कसोटीतून कोहली संघात पुनरागमन करेल अशी आशा सगळ्यांनाच आहे, पण सध्या तरी परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, कोहली उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी झाला, तरी चित्र स्पष्ट होणार नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, बोर्डाला कोहलीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

तिसऱ्या कसोटीत कोहली पुनरागमन करेल की नाही, हे काही दिवसांतच कळेल, जेव्हा संघ जाहीर होईल. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळला जाईल, ज्यामध्ये अजून 2 आठवड्यांहून अधिक वेळ बाकी आहे. अशा स्थितीत कोहलीला पुनरागमन करण्यासाठी बराच वेळ आहे. सध्या, फक्त विशाखापट्टणमवर लक्ष केंद्रित केले जाईल, जिथे 2 फेब्रुवारीपासून दुसरा कसोटी सामना सुरू होईल आणि टीम इंडियाला त्यात पुनरागमन करावे लागेल.