Fighter : एअरबेस, विमान, हेलिकॉप्टर… ऋतिक रोशनच्या फायटरमध्ये काय खोटे आणि काय खरे? हे झाले उघड


ऋतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर स्टारर चित्रपट फायटर आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती, मात्र ट्रेलर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली होती. पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर बनवण्यात आलेला हा एरियल अॅक्शन चित्रपट खूप चर्चेत आहे.

हा चित्रपट बनवताना प्रत्येक मिनिटाच्या तपशीलाची काळजी घेण्यात आल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगितले की, या चित्रपटासाठी त्यांनी लोकेशन्सपासून ते विमानापर्यंतच्या सर्व गोष्टींचा वापर केला आहे. सिद्धार्थ आनंद सांगतात की हा चित्रपट सुरू करण्यापूर्वी त्याला भारतीय हवाई दलाची परवानगी घ्यावी लागली.

चित्रपटाचे चित्रीकरण प्रत्यक्ष एअरबेसवर व्हावे अशी निर्मात्यांची इच्छा होती. यासाठी निर्मात्यांनी हवाई दलाला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तब्बल दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना एअरबेसवर शूट करण्याची परवानगी मिळाली. सिद्धार्थ आनंदने सांगितले की, हवाई दलाने त्याच्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट मागितली होती. जेव्हा त्यांना स्क्रिप्ट देण्यात आली, तेव्हा अधिका-यांनी त्यावर खूप चर्चा केली आणि नंतर कौतुकही केले. सिद्धार्थने सांगितले की, हवाई दलाने त्याला सर्व प्रकारची मदत केली. चित्रपटाचे चित्रीकरण तेजपूरच्या एअरबेसवर झाले आहे.

वास्तविक विमान आणि हेलिकॉप्टरसह चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. एवढेच नाही तर तळावर उपस्थित असलेले लोकही हवाई दलातील होते. सिद्धार्थने सांगितले की, चित्रपटात त्याने एअरफोर्सच्या रिअल ब्रीफिंग रूम आणि लॉकर रूमचा वापर केला आहे. बीटीएस व्हिडिओमध्ये, चित्रपटाचे निर्माते रॅमन चिब यांनी सांगितले आहे की, जेव्हा त्यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना स्क्रिप्ट दाखवली, तेव्हा ते म्हणाले की, ही स्क्रिप्ट एखाद्या फायटर पायलटने लिहिली आहे.

2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले. फायटर हा चित्रपट या संपूर्ण घटनेवर आधारित आहे. या दोन्ही घटना ट्रेलरमध्येही दाखवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी कलाकारांनी फायटरला पाकिस्तानविरोधी चित्रपट म्हटले आहे. यावर निर्मात्यांचे म्हणणे आहे की, हा चित्रपट कोणत्याही देशाविरोधात नसून दहशतवादाच्या विरोधात आहे.