चार विश्वविजेत्या क्रिकेटपटूंनी घेतली एकत्र निवृत्ती, एकाने केली देशाची 20 वर्षे सेवा, तर दुसऱ्याने 18 वर्षे


एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेणे सामान्य गोष्ट आहे. एक ना एक दिवस, प्रत्येक खेळाडू आपल्या कारकिर्दीला अलविदा करतो, परंतु एका देशाचे चार खेळाडू एकाच वेळी निवृत्ती जाहीर करतात, तेव्हा आश्चर्य वाटते. असाच काहीसा प्रकार वेस्ट इंडिजमध्ये घडला आहे. क्रिकेट विश्वात वेस्ट इंडिजची स्थिती चांगली नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. हा देश आर्थिक संकटाशी झुंजत आहे आणि या कारणास्तव या देशातील अनेक पुरुष खेळाडू जगभरातील लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देतात. मात्र निवृत्त झालेल्या खेळाडू महिला क्रिकेटपटू आहेत. वेस्ट इंडिजच्या चार महिला क्रिकेटपटूंनी एकत्र खेळाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजने एक निवेदन जारी करून सांगितले की, अनिसा मोहम्मद, शकीरा सेलमन, कायसिया आणि कायशोना नाइट यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वेस्ट इंडिजच्या महिला संघाने 2016 मध्ये भारतात खेळवण्यात आलेला टी-20 विश्वचषक जिंकून विश्वविजेतेपद पटकावले होते. या चौघीही त्या ऐतिहासिक विजयाचा भाग होते. यानंतर मात्र वेस्ट इंडिजचा महिला संघ पुन्हा विश्वविजेता होऊ शकला नाही.

ऑफस्पिनर मोहम्मदने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यावेळी ती केवळ 15 वर्षांची होती. ती एकदिवसीय आणि टी-20 मध्ये देशासाठी सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत तिने 141 एकदिवसीय सामन्यांमध्ये 180 विकेट घेतल्या. तिने 117 टी-20 सामन्यात 125 विकेट घेतल्या. पुरुष आणि महिला क्रिकेट एकत्र करून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारी ती वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासातील पहिली गोलंदाज होती. याशिवाय ती आपल्या देशासाठी T20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारी पहिली महिला गोलंदाज होती. तिने वेस्ट इंडिजसाठी पाच विश्वचषक आणि सात टी-20 विश्वचषक खेळले. मार्च 2022 मध्ये, ती ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळली, परंतु त्यानंतर ती दुसरा सामना खेळली नाही. गेली 20 वर्षे तिच्यासाठी अद्भूत असल्याचे ती म्हणाली.

तर वेगवान गोलंदाज सेलमनने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला. आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत तिने 100 एकदिवसीय सामन्यांमध्ये 82 विकेट्स आणि 96 टी-20 सामन्यांमध्ये 51 विकेट घेतल्या आहेत. तिने फेब्रुवारी 2023 मध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 विश्वचषक स्पर्धेत खेळला होता.

कायसिया आणि कायशोना या बहिणी आहेत. दोघीही पुढील महिन्यात 32 वर्षांच्या होणार आहेत. 2011 मध्ये कायसियाने वेस्ट इंडिजसाठी पहिला सामना खेळला होता. कायशोनाने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. विकेटकीपर-फलंदाज कायसियाने आपल्या देशासाठी 87 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1327 धावा केल्या. याशिवाय तिने 70 टी-20 सामन्यांमध्ये 801 धावा केल्या आहेत. तर मधल्या फळीतील फलंदाज कायशोनाने 51 एकदिवसीय सामन्यात 851 धावा आणि 55 टी20 सामन्यात 546 धावा केल्या आहेत. या दोघांनी देशासाठी शेवटचा सामना डिसेंबर 2022 मध्ये ब्रिजटाऊन येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता.