पाकिस्तानविरुद्ध 16 षटकार ठोकूनही फिन ऍलन राहिला या भारतीय फलंदाजाच्या मागे


ड्युनेडिन येथील युनिव्हर्सिटी ओव्हल मैदानावर फिन ऍलनने पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या उजव्या हाताच्या फलंदाजाने शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफसारख्या गोलंदाजांनी सज्ज असलेल्या पाकिस्तानी आक्रमणाविरुद्ध केवळ 62 चेंडूत 137 धावा केल्या. यादरम्यान त्याने 16 षटकार मारले, जो न्यूझीलंडच्या कोणत्याही खेळाडूचा एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. पण आम्ही तुम्हाला एक रंजक माहिती देतो की, 16 षटकार मारूनही हा खेळाडू भारतीय खेळाडूच्या मागे राहिला.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंच्या नावावर टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नाही. हा विक्रम एका अशा फलंदाजाच्या नावावर आहे ज्याचे नाव कदाचित अनेकांना माहित नसेल. आम्ही पुनीत बिश्तबद्दल बोलत आहोत, जो दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि मेघालयसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. सध्या पुनीत मेघालय संघात विकेटकीपर-फलंदाज म्हणून मैदानात उतरतो.

पुनीत बिश्तने 2021 साली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात कहर केला होता. मेघालयकडून खेळताना त्याने मिझोरामविरुद्ध 17 षटकार ठोकले. या सामन्यात पुनीत बिश्तने 51 चेंडूत 146 धावा केल्या होत्या. त्याने संघाची धावसंख्या 230 धावांवर नेली आणि त्याच्या संघाने 130 धावांनी सामना जिंकला. आज फिन ऍलनने 16 षटकारही ठोकले आणि जेव्हा रेकॉर्ड शोधले असता, तेव्हा असे दिसून आले की पुनीत बिश्त अजूनही ऍलनच्या पुढे आहे.

टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. या खेळाडूने 2017 मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगच्या सामन्यात 18 षटकार मारून विश्वविक्रम केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेलने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला होता. या डावखुऱ्या फलंदाजाने आयपीएल 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 17 षटकार ठोकले होते. फिन ऍलनने टी-20 इंटरनॅशनलमधील हरजतुल्ला झाझाईच्या विक्रमाची बरोबरी नक्कीच केली आहे. या खेळाडूने 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध 16 षटकार मारण्याचा पराक्रमही केला होता.