ब्लेड, खिळे, चेंडू आणि गांजा… कैद्याच्या पोटात हे सर्व पाहून डॉक्टरांना बसला आश्चर्यचा धक्का; कसा वाचवला जीव?


तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंचलगुडा जेल ही हैदराबादच्या जुन्या शहरात आहे. येथे शेकडो कैदी शिक्षा भोगत आहेत. या तुरुंगातील एक कैदी मोहम्मद सोहेल असून तो 21 वर्षांचा आहे. अलीकडेच 21 वर्षीय कैदी मोहम्मद सोहेलला पोटात तीव्र वेदना होत होत्या. त्याच्या पोटात दुखणे इतके तीव्र होते की त्याला ते सहन होत नव्हते. पोटदुखीची तपासणी करण्यासाठी तो तुरुंगातच डॉक्टरांकडे गेला होता.

कारागृहातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. कैद्याच्या पोटात दुखणे पूर्वीपेक्षा जास्त होत होते. त्यानंतर एस्कॉर्ट पोलिसांनी 8 जानेवारी रोजी कैद्याला उस्मानिया हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी जेव्हा कैद्याच्या पोटाची तपासणी केली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

एक्स-रे तपासणीत कैद्याच्या पोटात शेव्हिंग ब्लेड, दोन खिळे, दोन छोटे रबराचे गोळे, दोन प्लास्टिकची पाकिटे आणि इतर लहान वस्तू असल्याचे समोर आले. डॉक्टरांच्या पथकाने या सर्व गोष्टी पोटातून बाहेर काढल्या. पोटात सापडलेली प्लास्टिकची पाकिटे गांजा असल्याच्या संशयावरून प्रयोगशाळेत पाठवण्यात आली.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे डॉक्टर बी. रमेशकुमार यांनी सांगितले की, एंडोस्कोपीद्वारे ते यशस्वीरित्या काढण्यात आले आहे. कैद्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याने आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. कोणतेही ऑपरेशन न करता एन्डोस्कोपीच्या माध्यमातून रुग्णाचे प्राण वाचल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांनी सांगितले की, कैद्याने या गोष्टी कधी आणि का गिळल्या हे सांगितले नाही. ते म्हणाले की, रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला काही मानसिक समस्या आहे की नाही हे ते विचारतील. त्याला मानसिक समस्या असल्यास त्यावरही उपचार केले जातील.