निसार अली व वैशाली महाडिक या दाम्पत्याला महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार


अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य व समाजकार्य पुरस्कार दिले जातात. गेल्या वर्षी या साऱ्या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे आणि या पुरस्कारांचे अतुट नाते होते. हे लक्षात घेऊन या वर्षीपासून सर्व पुरस्कारांना ‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार‘ असे नाव देण्यात आले आहे. मुंबईतील मुंबईतील समाजसेवक निसार अली व वैशाली महाडिक या दाम्पत्याला महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

2023 या वर्षीचे साहित्यातील चार, समाजकार्यातील चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार असे एकूण नऊ पुरस्कारांची घोषणा साधना ट्रस्टचे संपादक विनोद शिरसाठ (समाजकार्य पुरस्कार) आणि मुकुंद टाकसाळे (साहित्य पुरस्कार समन्वयक) यांनी केली.

राष्ट्र सेवा दल आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटी तर्फे मालाड, मालवणी येथे गेली 34 वर्षांपासून सामाजिक काम करणाऱ्या निसार अली सय्यद आणि वैशाली महाडिक यांना रोख पन्नास हजार आणि स्मृती चिन्ह असा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. निसार व वैशालीने घरच्यांचा विरोध डावलून 20 वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केला होता.

यावर्षीचा पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यामध्ये ‘मासूम’ संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 15 जानेवारी 2024 रोजी एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पुणे येथे सायंकाळी 5 ते 7.30 यावेळेत आयोजित करण्यात येणार असल्याचे मासूम संस्थेच्या सह-समन्वयक, (महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार संयोजन समिती) डॉ. मनीषा गुप्ते यांनी कळवले आहे.