पंतप्रधानांच्या मध्यस्थीनंतर या खेळाडूसोबत घडला ‘चमत्कार’, आला जिवात जीव!


ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आपली बॅगी ग्रीन कॅप गमावल्यानंतर खूप नाराज झाला होता, परंतु आता त्याला ती कॅप रहस्यमय पद्धतीने परत मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही त्याची टोपी शोधण्याचे आवाहन केले होते. वॉर्नरला त्याची टोपी कधी आणि कुठे मिळाली हे जाणून घ्या?

सिडनीमध्ये कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला मोठी बातमी मिळाली आहे. वॉर्नरने खुलासा केला आहे की त्याला त्याची बॅगी ग्रीन कॅप मिळाली आहे. मेलबर्न कसोटीनंतर त्याने आपली कॅप गमावली होती, त्यानंतर तो खूप नाराज झाला होता.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी वॉर्नरने इंस्टाग्रामवर चाहत्यांना सांगितले की त्याला त्याच्या दोन बॅगी ग्रीन कॅप्स मिळाल्या आहेत.

वॉर्नरने सोशल मीडियावर या दोन कॅप्स शोधण्यासाठी भावनिक आवाहनही केले होते. याशिवाय, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी चाहत्यांना वॉर्नरची कॅप मिळताच परत करण्याची विनंती केली होती.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे वॉर्नरला त्याची हरवलेली बॅगी ग्रीन सिडनीतील एका हॉटेलमध्ये सापडली. त्याची बॅग सिडनीतील हॉटेलमध्ये कशी पोहोचली, हे कोणालाच कळू शकले नाही.

डेव्हिड वॉर्नर शनिवारी कसोटी क्रिकेटचा शेवट करु शकतो. सिडनीमध्ये पाकिस्तानची स्थिती वाईट आहे आणि वॉर्नरने विजयासह कारकीर्द संपवण्याची शक्यता आहे.