Ind Vs Sa : टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेचे गर्वहरण, 2 दिवसात जिंकला केपटाऊन कसोटी सामना


टीम इंडियाने सेंच्युरियन कसोटीतील पराभवाचा बदला घेत दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन कसोटीत दुसऱ्याच दिवशी पराभव केला आहे. केपटाऊन कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला आणि या मैदानावर प्रथमच कसोटी सामना जिंकला. यासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे, भारतीय संघाला येथे मालिका जिंकता आली नसली तरी मालिका नक्कीच वाचवली आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीम इंडियाने हा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत जिंकला आहे. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 55 धावांवर ऑलआउट केले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 153 धावा केल्या, त्यात विराट कोहलीच्या 46 धावा आणि रोहित शर्माच्या 39 धावा उपयुक्त ठरल्या.

टीम इंडियाला पहिल्या डावात 98 धावांची आघाडी मिळाली होती, तरी त्यांनी आपल्या डावात एक लाजिरवाणा विक्रमही केला. या डावात टीम इंडियाने शेवटच्या 6 विकेट एकही धाव न करता गमावल्या होत्या, हा कसोटी इतिहासातील एक विक्रम आहे. दुस-या डावात एडन मार्करामने शानदार शतक झळकावून आपल्या संघाला एक धार दिली.

मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 6 विकेट्स घेऊन भारतासाठी जो चमत्कार केला, तोच चमत्कार जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात केला आणि त्यानेही 6 विकेट घेतल्या. बुमराहच्या अप्रतिम ताकदीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 176 धावांत सर्वबाद झाला, त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले.

भारताने दुसऱ्या डावात प्रवेश करताच आक्रमणाला सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल 23 धावा करून बाद झाला, शुभमन गिलही 10 धावा करून बाद झाला आणि विराट कोहली 12 धावा करून बाद झाला. कर्णधार रोहित शर्माने शेवटपर्यंत उभे राहून टीम इंडियाला विजयापर्यंत नेले.

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारताचा हा पाचवा कसोटी विजय आहे, तर टीम इंडियाने केपटाऊनच्या मैदानावर सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या दहा वर्षात या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा हा तिसरा पराभव आहे, त्यामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात हरवले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दक्षिण आफ्रिकेत भारताचे कसोटी विजय

  • 2006 – 123 धावांनी विजय, जोहान्सबर्ग
  • 2010 – 87 धावांनी विजय, डर्बन
  • 2018 – 63 धावांनी विजय, जोहान्सबर्ग
  • 2021- 113 धावांनी विजय, सेंच्युरियन
  • 2024- 7 गडी राखून विजय, केपटाऊन

दक्षिण आफ्रिका-भारत कसोटी मालिका

  • पहिली कसोटी- दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 32 धावांनी विजय
  • दुसरी कसोटी- भारताने दोन दिवसात 7 विकेट्सने विजय मिळवला