काही केल्या थांबत नाही आहे कर्मचारी कपातीचे वादळ, 1000 हून अधिक लोकांना पेटीएमने काढले कामावरून


2022 मध्ये सुरू झालेली कर्मचारी कपातीची फेरी 2023 च्या समाप्तीपूर्वी परत येत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाची झलकही दिसू लागली आहे. देशातील सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या पेटीएमने 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची बातमी आहे.

सूत्रांच्या हवाल्याने ET च्या बातमीनुसार, Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने 1000 हून अधिक लोकांना त्यांच्या कामावरुन कमी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या विविध युनिटमधून कर्मचारी कपात करण्यात आली आहे.

‘Buy Now Pay Later’ ही सेवा बंद केल्यामुळे आणि लहान आकाराचे कर्ज देण्याच्या व्यवसायातून बाहेर पडल्यामुळे पेटीएमने ही कर्मचारी कपात केल्याचे मानले जात आहे. अलीकडेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशातील वाढती असुरक्षित कर्जे कमी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानंतर, बँकांकडून क्रेडिट कार्ड जारी करणे, वैयक्तिक कर्ज वितरण आणि बहुतेक इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘बाय नाऊ पे लेटर’ सेवेवर परिणाम झाला आहे.

पेटीएममधील ही कर्मचारी कपात या वर्षातील डिजिटल कंपन्यांमधील सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. हे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 10 टक्के आहे. बहुतेक कर्मचारी कपात कर्ज व्यवसाय युनिटमधून होण्याची शक्यता आहे. मात्र, पेटीएमकडून या कर्मचारी कपातीबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

दरम्यान, एक बातमी जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन गुगलशीही संबंधित आहे. गुगलने आपली आर्टिफिशियल इंटेलिजेंस वेगाने विकसित केली आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसांत सुमारे 30,000 लोकांना नोकरीतून काढून टाकण्याची शक्यता आहे. ‘द इन्फॉर्मेशन’च्या बातमीनुसार, गुगल येत्या काही दिवसांत आपल्या जाहिरात-विक्री विभागातून सुमारे 30,000 लोकांना काढून टाकू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला, Google ने 12,000 लोकांना त्यांच्या कामावरुन काढून टाकले होते.