आयपीएलपूर्वी या खेळाडूचे करिअर धोक्यात, आणखी एक चूक आणि संपेल सर्व काही


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटने पराभव केला होता. टीम इंडियाचा हा विजय खूपच सोपा होता. पुढच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेनेही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव केला. आता मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. टीम इंडिया पुढील काही महिने पुन्हा एकही वनडे खेळणार नाही. अशा परिस्थितीत हा सामना एका खेळाडूसाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे आणि ही त्याची शेवटची संधी असू शकते. त्याचे नाव आहे- संजू सॅमसन.

IPL 2024 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी, राजस्थान रॉयल्सने काही खेळाडू खरेदी केले, जे आगामी हंगामासाठी संघ मजबूत करू शकतात. मार्चमध्ये नवीन हंगाम सुरू होईल, तेव्हा संघाचा कर्णधार संजू सॅमसनकडे मजबूत संघ असेल, हे उघड आहे. पण आयपीएलपूर्वी सॅमसनला सध्या आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाचवण्याची चिंता आहे, जी टी-20 लीगपूर्वी संपुष्टात येऊ शकते.

जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सॅमसनला फलंदाजी करायला मिळाली नाही, पण दुसऱ्या सामन्यात त्याला मोठी खेळी खेळून आपला दावा सांगण्याची संधी मिळाली होती. 27व्या षटकात तिसरी विकेट पडल्यानंतर सॅमसन क्रीजवर आला. अशा परिस्थितीत सॅमसनकडे बराच वेळ होता, पण त्याच्या संपूर्ण कारकिर्दीप्रमाणेच या वेळीही तो संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला. सुमारे 5 षटके खेळल्यानंतर सॅमसन 23 चेंडूत केवळ 12 धावा काढून बाद झाला.

आता मालिकेतील शेवटचा सामना पार्ल येथे गुरुवार 21 डिसेंबर रोजी होणार आहे आणि अशा स्थितीत सॅमसनला संघातील स्थान कायम ठेवण्याची ही शेवटची संधी आहे. संघात आधीच ईशान किशन, सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू आहेत, तर तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि साई सुदर्शनही आपला दावा करत आहेत. अशा स्थितीत सॅमसनला या सामन्यात काहीतरी खास करावे लागेल.

सॅमसनने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 फॉर्मेटमध्ये पदार्पण केले, परंतु तो कधीही पुढे जाऊ शकले नाही. त्याला सातत्यपूर्ण संधी मिळत नाहीत आणि फक्त एक-दोन सामन्यांनंतर वगळले जाते, असे अनेकदा म्हटले गेले आहे, जे बऱ्याच अंशी खरे ठरले आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षांत त्याला इतक्या संधी मिळाल्या आहेत, ज्या सध्याच्या खेळाडूंमधील स्पर्धा लक्षात घेता पुरेशा मानल्या जाऊ शकतात.

सॅमसनने गेल्या दीड वर्षात काही चांगली खेळी खेळली असली, तरी त्याला संघात आपला दावा सांगता आला नाही. सॅमसनने 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने 402 धावा केल्या असल्या तरी यावर्षी त्याला 3 डावात केवळ 72 धावा करता आल्या आहेत. एकूण 24 टी-20 सामन्यांत तो 19 च्या सरासरीने केवळ 374 धावा करू शकला. यामध्ये 2023 मध्ये 6 डावात केवळ 78 धावा झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सॅमसनसाठी ही शेवटची संधी आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.