Online Scam : बँक खात्यातील झिरो बॅलन्स असेल तरी, तुम्हाला लागू शकतो लाखोंचा चूना, काय आहे हा घोटाळा?


जगभरात सायबर क्राईमची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, एक छोटीशी चूक आणि घोटाळेबाज लोकांच्या खात्यातून लाखो रुपये चोरत आहेत. बँक खात्यात झिरो बॅलन्स असतानाही लोकांची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला धक्का तर नक्की बसला असेल, नाही का? हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे की हे कसे घडले? खात्यात पैसेच नसतील, तर लाखो रुपयांची फसवणूक कशी होईल?

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका महिलेने आधी तिच्या खात्यातून ट्रेनचे तिकीट बुक केले, पण नंतर काही कारणास्तव महिलेला ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागले. रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतरही महिलेच्या खात्यात पैसे परत आले नाहीत, त्यानंतर महिलेने गुगलची मदत घेतली.

गुगलच्या मदतीने या महिलेला एक नंबर सापडला, ज्यावर तिने कॉल केला. ही त्या महिलेची सर्वात मोठी चूक होती. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर, घोटाळेबाजांनी महिलेला एक लिंक पाठवली, महिलेने या अनोळखी लिंकवर क्लिक करताच, घोटाळेबाजांना महिलेच्या फोनमध्ये प्रवेश मिळाला.

आणि सुरू झाला घोटाळेबाजांचा खेळ
महिलेच्या फोनवर प्रवेश मिळाल्यानंतर काय झाले, घोटाळेबाजांनी महिलेच्या अन्य बँक खात्यातून सुमारे 3 लाख रुपये काढले आणि महिलेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून लाखो रुपयांचे कर्जही घेतले. अशाप्रकारे खात्यात शून्य शिल्लक असतानाही या महिलेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सुटकेचा मार्ग कोणता?
तुम्हीही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल आणि काही कारणास्तव तुमचा रिफंड येत नसेल, तर गुगलवर कोणत्याही अनोळखी नंबरवर कॉल करण्याऐवजी, IRCTCच्या अधिकृत साइटवर जा आणि Contact Us वर क्लिक करा.

Contact Us वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत नंबर येईल, फक्त या नंबरवर कॉल करा. घोटाळेबाजांनी गुगलवर असे बनावट क्रमांक पोस्ट केले आहेत, त्यामुळे पुढच्या वेळी असा नंबर डायल करण्याची चूक करू नका.

दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर कोणी तुम्हाला तुमच्या पैशासाठी अनोळखी लिंकवर क्लिक करण्यास सांगत असेल, तर समजून घ्या की समोरची व्यक्ती तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे.

सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर
तुमच्यासोबतही असे काही घडले तर तुम्ही तात्काळ 1930 वर कॉल करून तक्रार नोंदवा, हा सायबर क्राईम नॅशनल हेल्पलाइन नंबर आहे.