5000 फुटांचे बंकर, 30 खोल्या… मार्क झुकरबर्गच्या गुप्त घरामध्ये आणखी काय आहे खास ?


सोशल मीडिया कंपनी मेटाचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग सध्या एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. झुकेरबर्ग हा हवाईमध्ये $100 दशलक्ष (830 कोटी) खर्चून स्वत:साठी एक टॉप सीक्रेट घर बांधत असल्याची माहिती आहे. झुकेरबर्गच्या या गुप्त हवेलीमध्ये भूमिगत बंकरसोबतच इतर गोष्टीही बांधल्या जात आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झुकेरबर्गची ही गुप्त हवेली हवाईयन बेट काउईवर बांधली जात आहे. 1400 एकर परिसरामध्ये डझनहून अधिक इमारती असतील. यासोबतच 30 झोपण्याच्या खोल्या आणि 30 स्नानगृहे बांधली जात आहेत. या सर्व इमारती एका बोगद्याद्वारे एकमेकांना जोडल्या जाणार आहेत.

बोगद्यातून बाहेर पडण्यासाठी जिना बांधण्यात येणार आहे. यासोबतच 5 हजार स्क्वेअर फुटांचा बंकर बांधण्यात येणार आहे. प्रत्येक प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्याची क्षमता या बंकरमध्ये असेल. झुकेरबर्गच्या या गुप्त हवेलीचा स्वतःचा ऊर्जेचा स्रोत असेल. म्हणजे बाहेरचा वीजपुरवठा बंद झाला, तरी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

कॅम्पसमध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारतींची सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट असणार आहे. इमारती आणि इतर निर्गमन आणि प्रवेशद्वारांमध्ये इलेक्ट्रॉनिक कुलूपांसह साउंड प्रूफ दरवाजे बसवले जातील. त्याचबरोबर वाचनालयासाठी गुप्त दरवाजा करण्यात येणार आहे. इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर गुप्त कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाईल.

हवेलीतील पाणीपुरवठ्याचीही व्यवस्था आतूनच केली जाणार आहे. त्यासाठी पंप बसवण्यात येणार असून पाणी साठवण्यासाठी मोठी टाकीही बांधण्यात येणार आहे. 1400 एकर जमिनीवर पशुसंवर्धन व शेती केली जाईल, त्यामुळे अन्नपदार्थ उपलब्ध होतील. आधुनिक इतिहासात झुकेरबर्गचे हे घर जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये गणले जाईल, असे सांगितले जात आहे.