वडील धावपटू, आई व्हॉलीबॉल खेळाडू, आता मुलगा करणार टीम इंडिया पदार्पण! दक्षिण आफ्रिकेसाठी केली आहे तयारी


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत केएल राहुल भारताचे नेतृत्व करत आहे. निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी युवा खेळाडूंचा संघ निवडला आहे. शुभमन गिल आणि इशान किशन हे देखील या संघात नाहीत. या मालिकेत सूर्यकुमार यादवलाही विश्रांती देण्यात आली आहे. संघावर नजर टाकली, तर ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त संघात एकही सलामीवीर नाही आणि अशा स्थितीत साई सुदर्शन पहिल्याच सामन्यात पदार्पण करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सुदर्शनने आयपीएलमध्ये शानदार फलंदाजी केली होती आणि त्यामुळेच तो निवडकर्त्यांच्या नजरेत आला आणि आता त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.

खेळ सुदर्शनच्या रक्तातच आहे. त्याचे वडील धावपटू आहेत आणि त्यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याची आईही व्हॉलीबॉल खेळायची. सुदर्शनने क्रिकेटर होण्याचे ठरवले आणि आता तो या मार्गावर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळणारा सुदर्शन रविवारी भारताच्या निळ्या जर्सीत दिसू शकतो.

सुदर्शन हा विजय हजारे करंडक स्पर्धेत सहभागी झाला होता. याचदरम्यान त्याची टीम इंडियात निवड झाल्याची बातमी मिळाली. याशिवाय चार दिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारत-अ संघातही त्याची निवड झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर अधिक उसळी आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी करायची असेल, तर बाउन्सर चेंडू खेळायला शिकावे लागेल, हे सुदर्शनला माहीत होते. त्यासाठी त्याने तयारीही केली आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सुदर्शनने सांगितले की, त्यासाठी टेनिस बॉलने सराव केला. तो म्हणाला की, आयपीएलदरम्यान त्याला टेनिस रॅकेटच्या प्रशिक्षणाची माहिती मिळाली. या प्रशिक्षणात चेंडू टेनिसच्या रॅकेटवर आदळला जातो आणि फलंदाजाला तो खेळावा लागतो. सुदर्शनने सांगितले की, जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळते, तेव्हा तो अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतो. त्याचा त्याला फायदा झाला आणि आता त्याच्या प्रतिक्रियेची वेळ अधिक चांगली झाली आहे, असे तो म्हणाला. दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध चार दिवसीय कसोटी सामना खेळल्यानेही त्याला मदत झाली. यावरून त्याला दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीची माहिती मिळाली.

सुदर्शनचे टीम इंडियासाठी पदार्पण होण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण गायकवाड याच्याशिवाय संघाकडे इतर कोणताही सलामीवीर नाही. केएल राहुल हे काम करू शकत असला, तरी तो बराच काळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळत आहे. संपूर्ण एकदिवसीय विश्वचषकातही तो याच क्रमांकावर खेळला. याशिवाय संजू सॅमसनचाही पर्याय भारताकडे आहे. पण तो मुख्यत्वे मधल्या फळीतील फलंदाज आहे. सुदर्शनची देखील शक्यता आहे, कारण तो डावखुरा फलंदाज आहे आणि भारताला डाव्या-उजव्या संयोजनासह जायला आवडेल, कारण त्यामुळे गोलंदाजांना अडचणी निर्माण होतात.