भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, या दोन संघांमध्ये होणार नाही कोणताही महामुकाबला


क्रिकेटच्या जगात भारत आणि पाकिस्तान यांच्यापेक्षा मोठी स्पर्धा नसते. या सामन्यावर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागलेले असते. दोन्ही देश राजकीय कारणांमुळे द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत, तर विश्वचषक आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. रविवारी, 17 डिसेंबर रोजी हे दोन्ही संघ पुन्हा एकदा भिडतील अशी शक्यता होती. हा एक चांगला सामना होऊ शकला असता आणि चाहत्यांनाही याची अपेक्षा होती. पण चाहत्यांची निराशा झाली आहे. सध्या दुबईत अंडर-19 आशिया चषक खेळला जात असून त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदाचा सामना होऊ शकला असता, पण हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत.

आठ वेळचा चॅम्पियन भारताचा बांगलादेशने दुसऱ्या उपांत्य फेरीत चार गडी राखून पराभव केला. त्याचवेळी पाकिस्तानची डोकेदुखी आणखीन वाढली. या संघाला पहिल्या उपांत्य फेरीत यूएईसारख्या संघाकडून अविस्मरणीय पराभव पत्करावा लागला. UAE ने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपापल्या लढती जिंकल्या असत्या, तर अंतिम फेरीत हे दोन्ही संघ भिडले असते.

आतापर्यंत आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे भारतीय फलंदाज उपांत्य फेरीत अपयशी ठरले. टीम इंडिया कोणतीही मोठी धावसंख्या करू शकली नाही. प्रथम फलंदाजी करताना हा संघ अवघ्या 188 धावांत गारद झाला. संघाकडून मुरुगन अभिषेकने सर्वाधिक 62 धावा केल्या. या खेळीत त्याने 74 चेंडूंचा सामना करत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. सर्फराज खानचा भाऊ मुशीर खाननेही 50 धावांचे योगदान दिले. 61 चेंडूंचा सामना करताना त्याने तीन चौकार मारले. या दोघांच्या खेळीच्या जोरावरच संघाला दीडशेचा टप्पा ओलांडता आला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खूप प्रयत्न केले, पण अपयशी ठरले. बांगलादेशने हे लक्ष्य सहा गडी गमावून पूर्ण केले. आरिफुल इस्लामने 90 चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 94 धावा केल्या. अहरार अमीनने 44 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

तर दूसरीकडे यूएईच्या गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि यूएईला 193 धावांत गुंडाळले. पाकिस्तानसाठी हे लक्ष्य सोपे होते, पण संपूर्ण संघ अवघ्या 182 धावांत गारद झाला. कर्णधार साद बेगने थोडी झुंज दिली आणि 52 चेंडूत 50 धावा केल्या, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. सादशिवाय अजान अवेसने 71 चेंडूत 41 धावा केल्या. मात्र हे दोघेही बाद होताच पाकिस्तानचे फलंदाज एक एक करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यूएईकडून अयमान अहमद आणि हार्दिक पै यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ओमिद रहमान, ध्रुव पराशर आणि अममार बदामी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.