ज्याला दिल्ली कॅपिटल्सने सोडले त्याने केला कहर, आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूची केली येथेच्छ धुलाई


वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला. या विजयासह यजमान वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजचा संघ टी-20 मध्ये अत्यंत धोकादायक मानला जातो. हा संघ या फॉरमॅटमध्ये दोन वेळा विश्वविजेता आहे आणि या संघाने इंग्लंडसमोर अशा प्रकारे रंग दाखवले की सध्याचा टी-20 विश्वविजेता पाहातच राहिला. या सामन्यात वेस्ट इंडिज टी-20 संघाचा कर्णधार रोव्हमन पॉवेल याने आपले कौशल्य दाखवत तुफानी शैलीत धावा केल्या. यादरम्यान त्याने आयपीएलचा महागडा खेळाडू सॅम करणचा खरपूस समाचार घेतला.

करणला पंजाब किंग्जने गेल्या वर्षी लिलावात 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यासह तो आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पॉवेल गेल्या वर्षीपर्यंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. मात्र यावर्षी दिल्लीने त्याला सोडले. पॉवेलची ही खेळी पाहून दिल्लीला त्याचा पुन्हा एकदा लिलावात समावेश करायला आवडेल.

पॉवेलने सॅम करणने टाकलेल्या एका षटकात एकूण 30 धावा दिल्या. करण वेस्ट इंडिजच्या डावातील 16 वे षटक टाकण्यासाठी आला होता. या सामन्यातील त्याचे हे दुसरे षटक होते. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पॉवेलला चौकार मिळाला. चेंडूने त्याच्या बॅटची आतील बाजू घेतली आणि चार धावा झाल्या. पुढच्याच चेंडूवर पॉवेलने लाँग ऑफवर षटकार ठोकला. पॉवेलने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. यानंतर सॅम करणने चेंडू वाईड फेकला. पॉवेलने चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला. पॉवेलने पुन्हा पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. म्हणजे त्याने चार चेंडूत सलग चार षटकार ठोकले होते. यानंतर करणने वाइड बॉल टाकल्याने या षटकात एकूण 30 धावा पूर्ण झाल्या. शेवटच्या चेंडूवरही षटकार येईल असे वाटत होते, पण यावेळी करणला दिलासा मिळाला आणि पॉवेलला हॅरी ब्रूकने झेलबाद केले.

वेस्ट इंडिजसाठी या सामन्यात पॉवेलने 28 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्याच्याशिवाय ब्रेंडन किंगची बॅट खेळली. या सलामीच्या फलंदाजाने 52 चेंडूत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 82 धावांची नाबाद खेळी केली. पूर्ण 20 षटके खेळल्यानंतर इंग्लंडचा संघ सात विकेट गमावून केवळ 166 धावा करू शकला. करणने खराब गोलंदाजीची भरपाई बॅटने भरुन काढण्याचा प्रयत्न केला आणि 32 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.