Koffee With Karan 8 : मलायका अरोरासोबत कधी लग्न करणार अर्जुन कपूर ? करण जोहरसमोर तोडले मौन


प्रश्न विचारल्यावर सहसा ‘नो कमेंट्स’ म्हणणारे अभिनेते डिस्ने हॉटस्टारच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये पोपटासारखे बोलू लागतात. करण जोहरच्या चॅट शोच्या ताज्या एपिसोडमध्ये अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी हजेरी लावली होती. करण जोहरने या दोघांसोबतच्या नात्याबद्दल खूप चर्चा केली. शोच्या सुरुवातीलाच करण जोहरने अर्जुन कपूरला विचारले की, तुमच्या दोघांचे (मलायका अरोरा-अर्जुन कपूर) नाते आता जगासमोर आहे. तुम्ही दोघेही एकत्र आयुष्य जगत आहात. दोघेही या नात्याला आणखी एक पाऊल (लग्न) पुढे नेणार आहात का? करणच्या या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन म्हणाला की, मलायका प्रकरणी फक्त आपली बाजू ठेवणे चुकीचे ठरेल.

अर्जुन म्हणाला की करण, मला तुझ्या शोमध्ये येऊन प्रामाणिकपणे उत्तर द्यायला आवडते, पण मी या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार नाही. मलाइकाशिवाय येथे बसून आपल्या भविष्याबद्दल बोलणे तिच्यासाठी चुकीचे आणि अन्यायकारक आहे. तिथे पोचल्यावर आम्ही दोघे मिळून त्याबद्दल बोलू. सध्या आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत. आमच्या नात्यात आतापर्यंत अनेक अडचणी आल्या आहेत. तरीही मी म्हणेन की आमच्या नात्याबद्दल एकट्याने बोलणे योग्य ठरणार नाही.

अर्जुन कपूरने करणशी त्याच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांबद्दलही चर्चा केली. सुरुवातीला सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कलाकारांपैकी तो एक असल्याचे अर्जुनने सांगितले. एकेकाळी त्याने यश पाहिले आणि आता त्याचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. हिट-फ्लॉप हा प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्याचा भाग असतो. कोणीही जाणूनबुजून असे फ्लॉप चित्रपट करत नाही, पण तो मरेपर्यंत अभिनय सोडणार नाही.