अझीम प्रेमजींना मागे टाकून देशातील श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचल्या सावित्री जिंदाल


भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल आता संपत्तीच्या बाबतीत विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांना मागे टाकत सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचल्या आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती 25 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. या काळात अझीम प्रेमजींच्या संपत्तीत 42 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

सावित्री जिंदाल यांचा जन्म 20 मार्च 1950 रोजी आसाममधील तिनसुकिया येथे झाला. 1970 मध्ये जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओमप्रकाश जिंदाल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना 9 मुले आहेत. जेव्हा त्या 55 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या पतीचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. ओमप्रकाश जिंदाल हेही हरियाणा सरकारमध्ये मंत्री होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण व्यवसाय सांभाळला.

विप्रोचे मालक अझीम प्रेमजी एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. पण गेल्या काही वर्षांत त्याच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 42 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ज्याचा परिणाम प्रेमजींच्या संपत्तीवरही झाला आणि आता ते देशातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आले आहेत.

भारतातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट आहेत या उद्योगपतींची नावे
1. मुकेश अंबानी
2. गौतम अदानी
3. शापूर पल्लोनजी मिस्त्री
4. शिव नाडर
5. सावित्री देवी जिंदाल
6. अझीम प्रेमजी
7. दिलीप शांतीलाल संघवी
8. राधाकिशन दमाणी
9. लक्ष्मी मित्तल
10. कुमार मंगलम बिर्ला