द्रविड सेहवागच्या मुलांचा ‘आमना-सामना’, जाणून घ्या कोण जिंकला


राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग ही भारतीय क्रिकेटमधील मोठी नावे आहेत. सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या द्रविडला द वॉल या नावाने ओळखले जात होते. याचे कारण द्रविडने विकेटवर पाय ठेवला असता, तर त्याला बाद करणे कठीण होत होते. तर सेहवाग त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जात होता. या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून बराच काळ लोटला आहे. मात्र भारताच्या देशांतर्गत स्पर्धेत पुन्हा द्रविड आणि सेहवाग यांच्यातील लढाई पाहायला मिळाली. हे युद्ध त्यांच्या दोन मुलांमध्ये आहे.

विजय मर्चंट ट्रॉफी सध्या भारतात आयोजित केली आहे. या अंडर-16 स्पर्धेत कर्नाटकचा सामना दिल्लीशी होणार आहे. कर्नाटकचे नेतृत्व राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड करत आहे. सेहवागचा मुलगा आर्यवीर दिल्लीकडून खेळत आहे.

या तीन दिवसीय सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी कर्नाटक संघाने फलंदाजी करताना 56.3 षटकात अवघ्या 144 धावा केल्या. द्रविडचा मुलगा अन्वय या डावात काहीही करू शकला नाही आणि खाते न उघडताच बाद झाला. त्याला आयुष लाक्राने बाद केले. दोन चेंडू खेळूनही त्याला खाते उघडता आले नाही. पण सेहवागच्या मुलाने ओपनिंग करताना शानदार अर्धशतक झळकावले. पहिल्या दिवशी 50 धावा करून तो नाबाद परतला. त्याच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीचा संघ कर्नाटकवर भक्कम आघाडी घेताना दिसत आहे. अशा स्थितीत पाहिले तर आर्यवीर आणि अन्वय यांच्यातील लढतीत आत्तापर्यंत आर्यवीरच वर्चस्व गाजवत आहेत. आर्यवीर दुसऱ्या दिवशी बाद झाला. त्याने 8 चौकार आणि एक षटकारासह 54 धावा केल्या.

या दोघांपूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही जेव्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रवेश केला, तेव्हा तो चर्चेत आला होता. तो सध्या आयपीएल खेळत आहे. अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत आहे. आता द्रविड आणि सेहवागच्या मुलांनीही आपल्या खेळाने चर्चेत येण्यास सुरुवात केली आहे. नुकताच द्रविड विश्वचषकानंतर मुलाचा सामना पाहण्यासाठी गेला होता आणि त्याचा फोटो व्हायरल झाला होता. प्रशिक्षक असताना द्रविडला त्याच्या मुलांकडे फारसे लक्ष देता आले नाही, पण संधी मिळेल, तेव्हा तो त्याच्या मुलांच्या खेळाची माहिती नक्कीच घेईल. द्रविडचा दुसरा मुलगा समितही देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. सचिन, सेहवाग आणि द्रविड यांच्यासारखे महान फलंदाज त्यांची मुलेही बनू शकतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.