शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना सरकारी नोटीस, पान मसाल्याची जाहिरात पडली महागात


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी पान मसालाचे प्रमोशन केल्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने आता आपले उत्तर दिले आहे. पान मसाला जाहिरात प्रकरणी शाहरुख, अजय आणि अक्षय कुमार यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला दिली आहे.

या प्रकरणात केंद्र सरकारच्या वकिलांचे म्हणणे आहे की, सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी. या प्रकरणावरील पुढील सुनावणीची तारीख 9 मे 2024 निश्चित करण्यात आली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने अवमान याचिकेवर हा आदेश दिला. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

पान मसालाचे प्रमोशन करणारे अभिनेते शाहरुख, अक्षय आणि अजय देवगण या तिघांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत त्यांचे पाऊल तरुणांसाठी योग्य नाही, असे मत याचिका दाखल करणारे वकील मोतीलाल यादव यांनी व्यक्त केले. मोतीलाल यादव यांचेही म्हणणे आहे की, स्टार्सने असे केल्याने लोकांचा भ्रमनिरास होत आहे. गेल्या ऑगस्ट 2023 मध्ये, हायकोर्टाने या याचिकेला प्रतिसाद न दिल्याबद्दल कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना अवमान नोटीस जारी केली.

22 ऑक्टोबर रोजी सरकारला अहवाल देण्यात आला होता, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. यानंतर अवमान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी सांगितले की, केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर मागवले आहे. त्याचवेळी, करार रद्द केल्यानंतरही अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीत दाखवल्याबद्दल संबंधित गुटखा कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचीही माहिती न्यायालयाला देण्यात आली.