हा खेळाडू तिसऱ्या पंचाचा ठरला होता पहिला बळी, 2 देशांसाठी खेळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट


दक्षिण आफ्रिका हा सध्याचा सर्वोत्तम क्रिकेट संघ आहे. या संघाने नुकतीच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. दक्षिण आफ्रिकेला एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही, पण हा संघ खूप मजबूत संघ मानला जातो. आजच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 1992 रोजी या संघाने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता आणि या सामन्यात संघाचा कर्णधार केप्लर वेसेल्सनेही इतिहास रचला होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने केवळ 184 धावा केल्या होत्या. संपूर्ण संघ 50 षटकांत गडगडला. दक्षिण आफ्रिकेने 49.3 षटकांत चार विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले आणि आपल्या एकदिवसीय कारकिर्दीची शानदार सुरुवात केली.

हा तो काळ होता, जेव्हा क्रिकेटमध्ये थर्ड अंपायरची पहिल्यांदाच ओळख झाली. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केप्लर हा एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला, ज्याला थर्ड अंपायरने आऊट दिले. त्याला जडेजाने बाद केले. मैदानावरील पंचांनी हे प्रकरण तिसऱ्या पंचांकडे पाठवले होते, ज्यांनी व्हिडिओ तंत्रज्ञानाद्वारे केप्लरला धावबाद घोषित केले आणि यासह डाव्या हाताच्या फलंदाजाने एकदिवसीय सामन्यात प्रथमच थर्ड अंपायरने आऊट देण्याचा विक्रम केला. या फलंदाजाने 100 चेंडूंचा सामना करत दोन चौकार मारले. केप्लर याआधी ऑस्ट्रेलियाकडून खेळत होता. संघांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंपैकी तो एक आहे.

या सामन्यात हॅन्सी क्रोनिएने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने 10 षटकात 32 धावा देत पाच बळी घेतले. भारताकडून अजय जडेजाने सर्वाधिक 48 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय डब्ल्यूव्ही रमणने 47 धावांचे योगदान दिले होते. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली होती. मात्र ही भागीदारी तुटताच उर्वरित फलंदाज एक एक करून बाद होऊ लागले. दक्षिण आफ्रिकेकडून पीटर कर्स्टनने 56 धावांची खेळी खेळली होती.