World AIDS Day : जेव्हा एक महिला कोणत्याही औषधोपचारांशिवाय एचआयव्हीमुक्त झाली, तेव्हा शास्त्रज्ञही झाले हैराण


जगभरात 4 कोटी रुग्ण एचआयव्हीशी झुंज देत आहेत. 2022 मध्ये 6,30,000 रुग्णांचा एड्समुळे मृत्यु झाला आहे. हे आकडे धक्कादायक आहेत. या आकडेवारीमध्ये, एचआयव्हीच्या एका प्रकरणाबद्दल देखील जाणून घ्या, ज्याने जगभरातील वैज्ञानिकांना आश्चर्यचकित केले. शास्त्रज्ञांमध्ये तो संशोधनाचा विषय बनला होता. हे प्रकरण अर्जेंटिनातील एका महिलेचे आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत ज्या एचआयव्ही विषाणूवर कोणताही अचूक इलाज सापडलेला नाही, तो त्या महिलेमधून आपोआप नष्ट झाला.

अर्जेंटिनाच्या त्या महिलेवर केलेल्या संशोधनात समोर आलेल्या गोष्टींची नोंद आर्काइव्ह्ज ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये करण्यात आली होती. आज जागतिक एड्स दिन, त्यानिमित्त जाणून घ्या काय होते प्रकरण.

काय होते संपूर्ण प्रकरण?
जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महिलेला कोणत्याही थेरपीशिवाय (एआरटी) एचआयव्हीपासून मुक्ती मिळाली होती. जगातील अशा प्रकारची ही दुसरी घटना होती. ही महिला 8 वर्षांहून अधिक काळ एचआयव्हीशी झुंज देत होती, परंतु तिने कोणतीही थेरपी घेतली नाही. शास्त्रज्ञांनी तिच्या एक अब्जाहून अधिक पेशींची तपासणी केली. तपासणीत एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली नाही.

का संपला व्हायरस?
एचआयव्हीच्या बाबतीत, विषाणू रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करुन कमकुवत करते. रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. परिणामी, रुग्णांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. अर्जेंटिनाच्या रुग्णामध्ये सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता, तो रोगप्रतिकारक शक्ती. बीबीसीच्या अहवालात तज्ञांनी सांगितले की रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच रोगाशी लढणारी यंत्रणा अशी होती की त्यामुळे विषाणू नष्ट झाले.

या प्रकरणाचा संदर्भ देत, बीबीसीच्या अहवालात असे म्हटले आहे की जगात काही रुग्ण आढळले आहेत, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या एचआयव्ही संसर्गाशी लढण्यास सक्षम आहे. अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे. काहींमध्ये असे जनुके आढळून आले, जे संसर्ग रोखण्याचे काम करतात. तज्ञांना आशा आहे की या रुग्णांवरील संशोधनामुळे एचआयव्हीच्या इतर गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात मदत होईल.

या विषाणूशी लढण्यासाठी आतापर्यंत कोणताही प्रभावी उपचार नाही. तथापि, असे पर्याय आहेत जे रुग्णाला दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करू शकतात. काही औषधे आणि उपचारपद्धती आहेत ज्यांच्या मदतीने एचआयव्ही नियंत्रित केला जाऊ शकतो. यापैकी एक म्हणजे अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी). पण त्याची मदत रुग्णाला आयुष्यभर घ्यावी लागते. या उपचारपद्धती आणि औषधांचा त्याग होताच, विषाणू पुन्हा मजबूत होतो.

एचआयव्ही आणि एड्समध्ये काय आहे फरक?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार एचआयव्ही आणि एड्समध्ये फरक आहे. एचआयव्ही हा एक विषाणू आहे, जो रोगाशी लढा देणारी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. एड्स ही अशी स्थिती आहे, जेव्हा एचआयव्ही संसर्गामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे कमकुवत होते.