अरे देवा! रेस्टॉरंटच्या जेवणात सापडले कापलेले बोट, ते पाहून घाबरली महिला


अशी कल्पना करा की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बसून स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेत आहात. पण, सॅलडमध्ये एखाद्या व्यक्तीचे कापलेले बोट दिसले, तर तुम्ही काय कराल? साहजिकच तुम्ही घाबरून जाल. अमेरिकेतील कनेक्टिकटमध्ये असेच काहीसे घडले, जेव्हा एका महिलेला कळले की तिने सॅलड नव्हे, तर पुरुषाचे छाटलेले बोट चघळले आहे. पीडित महिलेने रेस्टॉरंटविरोधात दावा दाखल केला आहे.

nypost च्या रिपोर्टनुसार, ग्रीनविचच्या एलिसन कोजीने सांगितले की, तिने या वर्षी 7 एप्रिल रोजी न्यूयॉर्कच्या लोकप्रिय रेस्टॉरंट ‘चॉप’मधून सॅलड ऑर्डर केले होते. महिलेचा आरोप आहे की तिला सॅलडमध्ये कापलेले बोट सर्व्ह केले होते, जे चघळताना तिला जाणवले की ते सॅलड नसून दुसरे काहीतरी आहे.

रेस्टॉरंट मॅनेजरचे बोट चुकून कापले गेल्याचे दाव्यात म्हटले आहे. एक दिवस आधी त्यांनी सॅलडसाठी भाजी कापली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयातही नेण्यात आले. मात्र तोडलेल्या बोटाचा काही भाग भाजीतच राहिला. हेच सॅलड अनेक ग्राहकांना देण्यात आले, ज्यामध्ये कोजीचा समावेश होता.

सॅलडमध्ये बोट दिसल्यानंतर तिला पॅनीक अटॅक आल्याचा आरोप महिलेने केला आहे. ती खूप घाबरली. एवढेच नाही, तर फिंगर सॅलड खाल्ल्यानंतर तिची मान आणि खांदे दुखत असल्याची तक्रारही केली आहे. महिलेच्या वतीने गुन्हा दाखल केल्यानंतर आरोग्य विभागाने चॉपला $900 चा दंड ठोठावला आहे.

ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 2016 मध्ये, कॅलिफोर्नियातील एका गर्भवती महिलेने अॅपलबीच्या रेस्टॉरंटवर तिला दिलेल्या सॅलडमध्ये रक्ताळलेली बोटं सापडल्याचा आरोप केला होता. 2012 मध्ये मिशिगनमधून असेच एक प्रकरण समोर आले होते, जेव्हा एका तरुणाने रोस्ट बीफ सँडविचमध्ये कापलेले बोट सापडल्याचा दावा केला होता.