ग्लेन मॅक्सवेलने T20I मध्ये केला धमाका, झळकावले 47 चेंडूत शतक, बाबर आझमचा विक्रम मोडून जागतिक क्रिकेटमध्ये माजवली खळबळ


ग्लेन मॅक्सवेलच्या 48 चेंडूत नाबाद 104 धावांच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने मंगळवारी अत्यंत रोमांचक तिसऱ्या T20 सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताचा पाच विकेट्सनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले. तिसऱ्या टी-20 मध्ये तत्पूर्वी ऋतुराज गायकवाडने शतक झळकावले, तर दुसरीकडे मॅक्सवेलने पुन्हा एकदा तुफानी खेळी खेळत भारताकडून विजय हिसकावून घेतला. मॅक्सवेलने आपल्या झंझावाती शतकी खेळीत 8 चौकार आणि 8 षटकार मारण्याचा चमत्कार केला. एवढेच नाही तर अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 4 चेंडूत 16 धावांची गरज असताना मॅक्सवेलने धमाका करत 6-4-4-4 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

आपल्या शतकी खेळीत मॅक्सवेलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय T20 मध्ये यशस्वी लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. असे करत मॅक्सवेलने बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना मॅक्सवेलने आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, बाबर आझमने आतापर्यंतच्या कारकिर्दीत 2 शतके झळकावण्यात यश मिळवले आहे. त्याचवेळी, मोहम्मद वसीमने लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2 शतके झळकावली आहेत.

या सामन्यात मॅक्सवेलने 47 चेंडूत शतक झळकावत शानदार कामगिरी केली. T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ठोकलेले हे संयुक्त सर्वात वेगवान शतक आहे. जोश इंग्लिसनेही टी-20 इंटरनॅशनलमध्ये 47 चेंडूत शतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. याशिवाय 2013 मध्ये टी-20 इंटरनॅशनलमध्ये अॅरोन फिंचने 47 चेंडूत शतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली होती.

मॅक्सवेलचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे चौथे शतक आहे. हे करत मॅक्सवेलने रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 शतके झळकावण्यातही यशस्वी ठरला आहे. आता मॅक्सवेल भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.